दिप सिधुला अटक नाही, पण २०० शेतकऱ्यांना अटक केली : राज्यसभेत संजय राऊत यांचा सवाल

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा : देशात सध्या शेतकरी आंदोलनावरून चांगलेच वातावरण तापले आहे. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांमध्ये वादळी चर्चा होत असून, विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर बुधवारपासून दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाले. यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर चर्चा करताना सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहे. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधताना दिप सिंधूला अद्याप अटक केली नाही, मात्र शेतकऱ्यांना अटकेचा सिलसिला सुरूच आहे, असा संतप्त सवाल उपस्थित केला.

संजय राऊत यांनी शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईवरुन संताप व्यक्त करताना म्हटले की, ज्याप्रकारे शेतकरी आंदोलनाची बदनामी केली जात आहे, ते देशासाठी योग्य नाही. राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याने मोदींप्रमाणे संपूर्ण देश दु:खी असल्याचे सांगताना दिप सिद्धूला अद्याप अटक का करण्यात आलेली नाही अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. ज्याप्रकारे शेतकरी आंदोलनाची बदनामी केली जात आहे ते योग्य नाही. तिरंग्याचा अपमान झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे संपूर्ण देश दु:खी आहे. पण सरकार तिरंग्याचा अपमान करण्यामागे असणाऱ्या खऱ्या आरोपींना अटक करत नाही. दिप सिद्धू कुठे आहे? त्याला अटक केला जात नाही. पण सरकारने २०० शेतकऱ्यांना अटक केली असल्याचे ते म्हणाले.

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवणारा आणि प्रक्षोभक भाषण करणारा पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याच्यासह इतर सहा जण अद्याप फरार आहेत. या सर्वांच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी बक्षीस जाहीर केलं आहे. यामध्ये दीप सिद्धूसह चार जणांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाखांचं रोख बक्षिस तर उर्वरित तीन जणांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी ५०,००० रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.