नाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर सातपूरकरांचा हंडा मोर्चा

माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या नेतृत्वात काढला मोर्चा

0

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक शहर व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. अजूनही पावसाच्या धो-धो सरी बरसत आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे तुडूंब भरली आहेत. मात्र असतानाही नाशिक शहरासह मनपा हद्दीत असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे गेल्या २० वर्षात नाशिक शहराला कधीही पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावली नाही. यंदा मात्र धो-धो पाऊस बरसल्यानंतर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, यासर्व पार्श्वभूमीवर भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातपूरकरांनी महापालिकेवर भव्य हंडा मोर्चा काढला आहे. तसेच मनपा आयुक्तांना निवेदन देताना अधिकारी वर्गांकडून कुठल्याही प्रकारचे नियोजन होत नसल्यानेच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यावेळी निवेदनात म्हटले की, शिवाजीनगर, श्रमिकनगर, ध्रुवनगर,गंगापुर, अशोकनगर, धर्माजी कालॅनी हा परिसर गंगापूर धरणाच्या उशाशी असून सुद्धा तसेच या भागात जलशुद्धीकरण केंद्र असून सुद्धा येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात सावळा गोंधळ चालू आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ या गंभीर समस्येचे निराकरण करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

त्याचबरोबर नाशिक शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय असून, अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या मोठमोड्या खड्यांमुळे नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. संबंधति ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे कामे केले जात असल्याने, ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे या ठेकेदारांकडून तत्काळ रस्त्यांची कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी देखील यावेळी निवेदनातून करण्यात आली. गंगापूर धरण परिसरात विजेचा प्रश्न नेहमी भेडसावत असतो, त्यासाठी त्या ठिकाणी सोलर सिस्टिमचा पर्याय म्हणून वापर करण्यात यावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे करण्यात आली.

तसेच यासर्व समस्या आठ दिवसात न सोडविल्यास पुन्हा जनआंदोलन केले जाईल, तसेच यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. याप्रसंगी माजी सभागृहनेता दिनकर पाटील, भाजप सरचिटणीस जगन पाटील, माजी नगरसेविका लता  पाटील, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर यांच्यासह शेकडो महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.