आम्ही कुठले शहनशाह? मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या ‘या’ नेत्याला प्रत्युत्तर

‘ओरबडून, ओरबाडून सत्ता हस्तगत केली, मात्र कामाचा अजून पत्ता नाही’ अशी टीकाही त्यांनी केली

0

पुणे : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. ‘ओरबडून, ओरबाडून सत्ता हस्तगत केली, मात्र कामाचा अजून पत्ता नाही’ अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला. पुरंदर तालुक्यातील राजेवाडी भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, गणेशोत्सवात गणेश मंडळांना भेटी देण्याचा एक कलमी कार्यक्रम मुख्यमंत्री शिंदे यांनी राबवला. आता गणरायाला निरोप देण्यात आला आहे. त्यामुळे आतातरी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे. गणेशोत्सवात राज्याला दोन मुख्यमंत्री हवेत, एक गणपती दर्शनासाठी आणि दुसरे मंत्रालयात बसून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. दरम्यान, पुरंदर येथील राजेवाडी याठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्वरीत पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

निर्मला सीतारामण बारामतीत आल्यानंतर आम्ही या मतदारसंघासाठी ५ ते १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी करणार आहोत. देशाच्या एवढ्या मोठ्या बजेटमध्ये हजार-दोन हजार कोटी काही मोठी रक्कम नाही. शेतकऱ्यांचे, सामान्य लोकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्राने मदत करावी. सुदैवाने सीतारामण या बारामतीला येणार आहेत. आम्ही लोकशाही मानणारे आहोत, त्यामुळे जितके पक्ष येतील त्या सर्वांचे आम्ही स्वागतच करू, असा टोला त्यांनी लगावला.

शरद पवार हे केवळ साडे तीन जिल्ह्यांचे शहनशाह असल्याची टीका भाजपाच्या अतुल भातखळकर यांनी केली होती. त्यावर त्यांनी हे प्रत्युत्तर दिले. आम्ही कुठले शहनशाह? मायबाप जनता हीच शहनशाह. भाजप हा राजा आहे आम्ही तर साधे रंक आहोत, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

पुरंदरला विमानतळ करण्यास स्थानिकांचा विरोध नाही. केवळ जागेसंदर्भात काही मतभिन्नता आहेत. मात्र अशा संवेदनशील मुद्द्यांवर सर्वांशी चर्चा करायला हवी. मार्ग नक्कीच निघेल. त्यामुळे यात काही अडचणी येतील, असे मला वाटत नाही, असे सुळे म्हणाल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.