प्रभाग ९ बनला समस्यांचे आघार, नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन

प्राभग ९ मध्ये सुविधांच्या नावे नुसताच बकालपणा

0

नाशिक : महापालिका प्रभाग क्रमांक ९ मध्ये नागरिकांच्या सुख सुविधांची कामे होणे आवश्यक होते. परंतु नागरिकांची मागणी लक्षात घेता योग्य ती कामे या प्रभागामध्ये झालेली नाही. कुठेतरी चार ते पाच कामे वगळता उलट प्रभागात समस्यांचे डोंगर उभे राहिले आहे, प्रभागामध्ये एकही काम समाधान कारक झालेले नसल्याने नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या तातडीने समस्या सोडवाव्यात अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले की, नागरिकांच्या या समस्या सोडविणे हे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन अधिकारी म्हणून आपले प्रथम कर्तव्य आहे, त्यामुळे आपण तातडीने या समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी केली. यावेळी प्रभागत असलेल्या समस्या निवेदनात नमुद करण्यात आल्या.

१. प्रभागातील मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात झाडेझुडूपे वाढली असून त्यावर कचरा घाणीचे साम्राज्य झाले आहे. यामुळे मोकाट कुत्रे व जनावरे खूप मोठ्या प्रमाणात तेथे जमा होत असून अनेक लहान मुलांना मोकाट कुत्र्यांनी जखमी केले आहे त्यासाठी आपण तात्काळ मोकाट कुत्रे पकडण्यासाठी कार्यवाही करावी.

२. प्रभागातील उद्याने ग्रीन जिम त्यामधील साहित्य खराब होऊन उद्याने भकास होत चालली असून त्याची निगा राखण्यासाठी आपल्या महापालिकेतील कर्मचारी असमर्थ ठरत आहे. उद्याने व ग्रीन जिम यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.

३. प्रभागातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून फक्त तात्पुरता स्वरूपाची डागडुजी केली जात आहे सदर कामे देखील अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे केले जात आहे त्याची संपूर्ण माहिती घेऊन आपल्या स्तरावर हे कामे चांगल्या दर्जाचे करावी ही विनंती. तसेच प्रभागातील ज्या रस्त्यांची कामे झाली आहेत त्या कामांची चौकशी करण्यात यावी जे रस्ते मंजूर झाले आहेत ते झाले की नाही याचीही तपासणी करावी व यात जर काही चूक असेल तर दोषीनवर कडक कारवाई करावी मुख्यतः मळे परिसरातील रस्त्यांकडे ही लक्ष द्यावे.

४. प्रभागातील कार्बन नाका येथे असलेल्या भाजी बाजाराला अधिकृत मंजुरी द्यावी व त्या ठिकाणी मोठे स्ट्रीट लाईट उभे करावे योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच स्वतंत्र जागेमध्ये मटन मार्केट ची सुद्धा उभारणी करावी वेगवेगळ्या ठिकाणी हॉकर्स झोन तयार करून हॉकर्सची नोंदणी महानगरपालिकेकडे करावी व लहान-मोठे उद्योग करणाऱ्या व्यवसायिकांना व्यवसाय व्यापार करण्यासाठी चालना द्यावी.

५. प्रभागाला लागून मोठी औद्योगिक वसाहत आहे येथे रोज हजारो कामगार कामासाठी जात येत असतात तेव्हा कामाला जाण्याच्या व येण्याचा वेळेत अवजड वाहनांस प्रवेश बंदी करावी व अपघात टाळावे.

६. प्रभागातील महापालिकेच्या निधीतून नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शाळेचे कोरोना पार्श्वभूमीवर ई-उदघाटन आपल्या व महापौरांच्या हस्ते करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट मोकळी करावी. अन्यथा प्रभागातील नागरिकांच्या वतीने हे उद्घाटन आम्हाला करावे लागेल याची नोंद घ्यावी.

७. प्रभागामध्ये अनेक स्ट्रीट लाईट हे बंद स्वरूपात असून त्याची तात्काळ दुरुस्ती करून चालू करावी.

८. प्रभागातील अनेक ठिकाणी विद्युततारा,विद्युत वाहिनी पोल हे नादुरुस्त आहे तरी ते तात्काळ अंडरग्राउंड करून त्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी.

९. प्रभागातील घरगुती वापरासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याची वेळ बदलण्यात यावी.

यांसह अनेक समस्या ह्या प्रभागात भेडसावत आहे तरी वरील समस्यांचे निरसन व्हावे अन्यथा सर्व पक्षीय पदाधिकारी, सामाजिक संघटना व नागरिक यांच्या माध्यमातून मोठे जनआंदोलन उभे केले जाईल व यास आपण व आपले प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असा इशाराही यावेळी देण्यात आला. याप्रसंगी करण गायकर, सविता गायकर, सदाशिव माळी, दिनकर कांडेकर, प्रमोद जाधव, महेश आहेर, एमडी शिंदे, सम्राट सिंग, नवनाथ शिंदे, सचिन निकम, मनीषा गांगुर्डे, संगीता उबाळे, कल्पना बैरागी, प्रियंका गायकर आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.