नाशिकमध्ये २५, २६ मार्चला विद्रोही साहित्य संमेलन, ग्रेटा थनबर्ग येणार?

स्वागताध्यक्षपदी शशी उन्हवणे

0
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एक दिवस आधीच नाशिक शहरात संविधान सन्मानार्थ 15 वे विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शशी उन्हवणे यांची निवड करण्यात आली असून, उद्घाटनास मानवतावादी व पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांना बोलावण्यात येणार असून, त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. तसेच काही तांत्रिक बाबींच्या अडचणी लक्षात घेत वकिलांचे एक पथकही यासाठी नियुक्त केल्याची माहिती विद्रोही साहित्य संमेलनाच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते त्र्यंबक सिग्नल, नवीन बसस्थानकाजवळ, नाशिक येथील शेकापच्या कार्यालयात संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. गणेश उन्हवणे यांनी प्रास्ताविक केले. विद्रोही साहित्य संमेलनाची भूमिका आणि प्रस्थापित ब्राह्मणवादी साहित्याला आमनेसामने उत्तर देण्यासाठी व सांस्कृतिक लढा देण्यासाठी या विचारांच्या जागराच्या माध्यमातून हे संमेलन घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले. तर प्रा. प्रतिमा परदेशी यांनी विद्रोही साहित्य संमेलनातील विविध समित्या तसेच पदाधिकारी नियुक्तीबाबत माहिती दिली. नावांची घोषणा यशवंत मकरंद यांनी केली. यावेळी साहित्य संमेलनस्थळाबाबत विचारविनिमय सुरू असून, लवकरच त्याचीही घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागूल, लोकशाहीर वामनदादा कर्डक, कवी अरुण काळे, दादासाहेब गायकवाड आदींच्या विचारांचा वारसा घेऊन हे संमेलन पार पडणार असल्याचेही प्रा. परदेशी म्हणाल्या. तर किशोर ढमाले म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर आमचा बहिष्कार असून, म. फुले यांना अपेक्षित असलेले आणि म. फुलेंनी ग्रंथकार सभेस लिहिलेल्या पत्रावर आधारित विद्रोही साहित्य संमेलन पार पडणार आहे. 25 मार्चला संमेलनास प्रारंभ होऊन बाबूराव बागूल यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 26 मार्चला संमेलनाचा समारोप होईल, असेही ढमाले म्हणाले. याप्रसंगी प्रभाकर धात्रक, प्रा. डॉ. इंदिरा आठवले, डॉ. अनिल सोनवणे, वामनराव गायकवाड, नितीन भुजबळ, गणेश उन्हवणे, नीलेश सोनवणे, अर्जुन बागूल, यशवंत बागूल, डॉ. संजय जाधव, ड. मनीष बस्ते, राकेश वानखेडे, साराभाई वेळुंजकर, रंगराज ढेंगळे आदी उपस्थित होते.
अशी आहे पदाधिकारी निवड
स्वागताध्यक्ष शशी उन्हवणे, मुख्य निमंत्रक प्रा. डॉ. इंदिरा आठवले, मुख्य संयोजक कॉ. राजू देसले, कार्यवाह गुलाम शेख, प्रा. डॉ. अशोक दुलदुले, कार्याध्यक्ष प्रभाकर धात्रक, सहनिमंत्रक नितीन रोटे पाटील, सहसंयोजक नानासाहेब पटाईत, दत्ता वायचळे, व्ही. टी. जाधव, आसिफ शेख, संमेलन विश्वस्त ड. मनीष बस्ते, गणेश उन्हवणे, समन्वयक करुणासागर पगारे, कॉ. किशोर ढमाले, स्वागत समितीत राजेंद्र भोसले, राकेश वानखेडे, किरण मोहिते, डॉ. अनिल सोनवणे, डॉ. विशाल जाधव, नितीन डांगे-पाटील, शरद शेजवळ, ड. विद्या कसबे, डॉ. जालिंदर इंगळे, प्रा. ए. टी, कसबे, दिनेश ठाकरे, प्रा. डॉ. जयश्री खरे, चंद्रकांत गायकवाड, श्यामल चव्हाण, स्वाती त्रिभुवन, रविकांत शार्दूल, संजय डोंबाडे, मिलिंद देहाडे,विनोद घोडेराव आदी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.