आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना निरोप

प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांकर यांचाही कार्यकाळ संपला

0

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर व प्रति- कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर यांच्या पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांचा विद्यापीठ परिवाराकडून सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाप्रसंगी विद्यापीठाचे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी श्री. एन. व्ही. कळसकर, डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल डॉ. राजश्री नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

या सत्कार समरंभाप्रसंगी बोलतांना विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, कोविड-19 च्या परीस्थितीत आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती, डॉक्टर व विद्यार्थ्यांचे काम कौतुकास्पद आहे. याकरीता विद्यापीठाकडून कोविड सुरक्षा योजना सुरु करण्यात आली. इंटरनॅशनल एज्युकेशन हब अंतर्गत विद्यापीठाने विविध परदेशी शिक्षण संस्थासमवेत करार केले आहे, संशोधन प्रकल्पाकरीता याचा सर्वांना लाभ होईल. ते पुढे म्हणाले की, कुलगुरु पदाच्या कार्यकाळात विद्यापीठात ऑनलाईन पध्दतीने कामकाज, सौरउर्जेचा वापर, विद्यापीठाचे विभागीय केंद्र सक्षम करणे, विद्यार्थ्यांकरीता विविध कल्याणकारी योजनांचा प्रारंभ करण्यात आला आहे. राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर सी.सी.टीव्ही. चा वापर करण्यात आला यामुळे परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळणे शक्य झाले आहे. याकरीता मा. प्रति-कुलपती अमित देशमुख यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले. आपले सर्वांचे सहकार्य व काम करण्याची उत्कृष्ट पध्दती यामुळेच मला यशस्वीतेकडे वाटचाल करता आली असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मा. प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर यांनी सांगितले की, विद्यापीठ स्तरावर कामकाज करण्याची संधी मला मिळाली या संधीतून मी विद्यापीठाचे फेलोशिप, पीएच.डी. अभ्यासक्रम या संदर्भात काम केले. विद्यापीठाचा स्पंदन युवा महोत्सव कार्यक्रमात युवकांचा सहभाग घेतला यामुळे काम करण्यात नवे चैतन्य निर्माण झाले. विद्यापीठाचे मा. कुलगुरु व अन्य अधिकारी यांचे कामाची पध्दती व साध-सोप वागण मला नेहमीच भावल आहे. शैक्षणिक कार्यात गोदावरी ते गोदावरी अशी परिक्रमा झाली आहे. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या योगदानामुळेच विद्यापीठाचा नावलौकिक झाला आहे. कोविड-19 च्या काळात शासनाच्या निर्देशांचे पालन करुन परीक्षा पासून ते आरोग्य सेवेपर्यंत सेवाभावी वृत्तीने कार्य केले याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यात असून विद्यापीठाचा विविध उपक्रम आदर्श असतात. विद्यापीठात शैक्षणिक व प्रशासकीय कामांबरोबर संशोनधन आणि प्रशिक्षण यावर अधिक काम होणे गरजेचे आहे. कोविड-19 च्या काळात विद्यापीठाने व विविध आरोग्य संस्थांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधनाचे कामकाज विद्यापीठातून यापुढे घडावे यासाठी मी प्रयत्नशील राहील असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, आरोग्य शिक्षणात त्यांचा मोठा हातखंडा असून प्रशासकीय कामकाजाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी केंद्रशासनाच्या उच्चस्तरीय समितीत यापुढे काम करावे आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. विद्यापीठाने संशोधनाला चालना मिळावी याकरीता इंटरनॅशनल एज्युकेशन हब, अवयवदान जनजागृती, ई-पेमंेट गेटवे, आरोग्य बॅंक आदी उपक्रम मा. कुलगुरु यांच कार्यकाळात राबविण्यात आले तसेच नॅकच्या मानांकनानुसार महाविद्यालयांची कार्यप्रणाली करण्यात आली आहे. विद्यापीठ आवारात शासकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी नुकतीच शासनाकडून मान्यता प्रदान करण्यात आली असून मा. कुलगुरु व प्रति-कुलगुरु यांच्या या सत्कार समारंभाप्रसंगी त्यांच्या संकल्पना लवकरच वास्तवात येतील असे त्यांनी सांगितले. या सत्कार समारंभात मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते डॉ. दिलीप म्हैसेकर व प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांचे विद्यापीठातर्फे स्वागत मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी स्वागत केले.

या सत्कार समारंभात जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सत्कार समारंभात विद्यापीठाच्या विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल डॉ. राजश्री नाईक, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखादिधकारी एन.व्ही. कळसकर, डॉ. चक्रधर मुंघल यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यापीठातील अधिकारी प्रकाश पाटील, एम.एम. जॉन्सन, संजय नेरकर, संदीप राठोड, संदीप कुलकर्णी, संदीप महाजन, राजेश इस्ते आदींची प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमास विद्यापीठाचे विविध प्राधिकरण सदस्य, महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राचार्य, शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कोविड-19 संदर्भाने शासनाने निर्देशित केलेल्या आदेशाचे पालन करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.