उद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी केली; भास्कर जाधवांकडून टीका!

संदीपान भुमरे यांना शिवसेनेने सहा वेळा उमेदवारी दिली. त्यांना शिवसेनेने त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री केले, असेही जाधव म्हणाले

0

परभणी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत शिवसेनेत उभी फूट पाडली आहे. सध्या राज्यात शिंदे गट आणि शिवसेना नेते आमने-सामने उभे ठाकले असून, त्यांच्याकडून दररोज एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. विशेषत: शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्याकडून शिंदे गटातील आमदार-मंत्र्यांचा समाचार घेतला जात आहे. आता त्यांनी संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘संदीपान भुमरे यांना शिवसेनेने सहा वेळा उमेदवारी दिली. त्यांना शिवसेनेने त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री केले. तरीसुद्धा भुमरे यांनी शिवसेनेला धोका देऊन, विश्वासघात करून, शिवसेना सोडून गेले, ते कशाकरिता गेले? तर शेवटी काही मिळवले त्यातले वाटलेच पाहिजे आणि म्हणून ते वाटत असतील. त्यामुळे त्यामध्ये काही उपवासाचे कारण नाही. तर ती वस्तुस्थिती आहे,’ अशी टीका जाधव यांनी केली.

जाधव यांनी सांगितले, ‘मी आता परभणीला आमचे खासदार संजय बंडू जाधव यांच्या घरी आलेलो आहे. त्यांनी मला सांगितले की, या परभणीमधून अनेक लोक शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले, शिवसेनेला सोडून गेले; परंतु इथल्या जनतेने शिवसेनेला कधीही सोडले नाही. इथले आमदार-खासदार हे कायम शिवसेनेचेच निवडून आले. भविष्यामध्ये इथे खासदार तर निवडून येतीलच; परंतु इथे आणखीन आमदारांची भर परभणी जिल्हा टाकेल, असा विश्वास जिल्ह्याने मला दिला.

राज्याचा प्रमुख असतो त्याने राज्यातल्या जनतेकडे समन्वयाने पाहायचे असते. तसेच आता जनतेलासुद्धा पश्चात्ताप झालेला आहे. ज्यांना झाला नव्हता त्यांनाही पश्चात्ताप होईल, की कोणती चुकीची माणसे सत्तेवर आली आहेत. बंडूशेठ जाधव आणि बाकीच्या लोकांची इथे खंबीरपणे शिवसेना आहे. इथल्या स्थानिक लोकांना निश्चितपणे ते न्याय मिळवून देतील.” असे भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.