धुळ्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच दोन गटांत राडा

धुळ्याच्या राष्ट्रवादीत आलबेल नसल्याचे स्पष्ट

0

धुळे : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांच्या ‘परिवार संवाद यात्रेत’ दोन गटांत राडा झाला. दोन्ही गट एकमेकाला भिडल्याने ना. पाटील यांनी हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावून वाद थांबवला. यामुळे ‘परिवार संवादा’मध्ये व्यत्यय आला. प्रदेशाध्यक्षांसमोरच घडलेल्या या प्रकारामुळे धुळ्याच्या राष्ट्रवादीत ऑलवेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, पक्षात गटबाजी असल्याच्या व राडा होणार असल्याचे ‘पुढारी’चे वृत्त खरे ठरले आहे.

जिल्ह्यामध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीमध्ये परिवार संवाद यात्रेला सुरुवात झाली. धुळे तालुक्याचा मेळावा सुरू झाला. या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी आपले मत मांडण्यास सुरुवात केली. या मेळाव्यात माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे तसेच राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा म्हाडाचे सभापती किरण शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांचे गटदेखील मेळाव्याला उपस्थित असल्याने या कार्यकर्त्यांनी आपले मत मांडत असताना विधान परिषदेवर किरण पाटील यांना संधी देण्याची मागणी केली.

तसेच, एका कार्यकर्त्याने माजी आमदार अनिल गोटे यांच्या कार्यशैलीसंदर्भात ताशेरे ओढले. यानंतर उभ्या राहिलेल्या गोटे समर्थक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुसुंबा गटात मदत केली नसल्याने अपेक्षित यश मिळाले नसल्याचा थेट आरोप केला.काही क्षणातच चर्चा मुद्द्यावरून गुद्द्यापर्यंत पोहोचली. यावेळी मंत्री पाटील यांनी माईकवरूनच कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. पण त्याचा उपयोग झाला नाही. काही वेळानंर पोलिसांनी व माजी आमदार अनिल गोटे तसेच पाटील गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त कार्यकर्त्यांना वेगळे केले. हा गोंधळ थांबताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषणाला सुरुवात केली. या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.