नाशिकमध्ये पूर्णत: लॉकडाऊन नाहीच, मात्र ‘या’ कडक नियमांची होणार तातडीने अंमलबजावणी

मनपा आयुक्त : कोरोनाला रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन जाहीर

0

नाशिक : झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना संसर्गात देशातील टॉप टेन शहरांमध्ये नाशिकचा समावेश असला तरी, पूर्णत: लॉकडाऊन हा पर्याय ठरू शकत नाही, अशा शब्दात महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी लॉकडाऊनची शक्यता फेटाळली आहे. तसेच निष्ठूर होऊन चालणार नाही, तर कठोर होऊन परिस्थिती हाळणार असल्याचे सांगताना, कोरोनाला रोखण्यासाठी मनपा अन् पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शुक्रवारी राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी प्रशासनाची कानउघडणी केल्यानंतर मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सर्व विभागप्रमुखांची शनिवारी सकाळी १०.३० वाजता तातडीने बैठक घेतली. बैठकीला शहर पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता, तुर्तास लॉकडाऊन घोषित केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी आयुक्तांनी सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता होती. त्यावेळी नाशिककरांनी नियम पाळल्याने, कोरोनाचा संसर्ग कमी होत गेला. मात्र नंतरच्या काळात नाशिककरांची बेफिकीरी वाढल्याने, आता दुसरी लाट आली आहे. त्यामुळे नागरिकांना ‘मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग’ या त्रिसुत्रीचा वापर करावाच लागेल. जे नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आतापर्यंत कागदावर आम्ही काम करीत होतो, परंतु आता मनपा अन् पोलीस रस्त्यावर उतरून कारवाया करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढे त्यांनी सांगितले की, सद्यस्थितीत ७० टक्के रुग्ण गृह विलगिकरणात आहेत. मात्र हे रुग्ण सर्वात वेगाने कोरोनाचा संसर्ग पसरवित आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे असून, त्याकरिता खास अरोग्य पथके तयार करण्यात आले आहेत. जर या रुग्णांनी नियमांचे पालन केले नाही, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच त्यांना मनपाच्या रुग्णालयात दाखल केले जाईल. त्याचबरोबर नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून, हेल्पलाइन नंबर कार्यान्वित करण्यात आले आहेत. सेंट्रल बेड रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. याकरिता पहिल्याच दिवशी ७३ नागरिकांनी संपर्क साधला असता, ५१ रुग्णांना बेड उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कंत्राटी स्वरूपात नेमलेल्या ५०० पैकी २७६ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रूजू केले आहे. त्यांच्या माध्यमातून शहरातील सर्वेक्षण केले जाणार आहे. मंगल कार्यालय, लॉन्स याठिकाणी मनपा प्रशासन आणि पोलीस संयुक्तपणे कारवाई करणार आहे. ५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत दंड आकारण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. या पथकांसोबत स्वत: मी, विभागीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच नाशिककर शिस्तप्रिय आहेत. त्यामुळे त्यांनी ‘मी जबाबदार’ या शासनाच्या मोहिमेचा विचार करून पुरेशी काळजी घ्यावी असे आवाहनही आयुक्तांनी याप्रसंगी केले.

… तर लॉकडाऊनचा विचार 

सध्या कुठल्याच जिल्ह्यात पूर्णत: लॉकडाऊन नाही. नाशिकमध्ये शनिवार-रविवार दोन दिवस काही निर्बंधासह लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विचार करता शंभर टक्के लॉकडाऊनची तुर्त गरज नाही. मात्र परिस्थिती शनिवार-रविवारच्या लॉकडाऊननंतरही बिकट होत गेल्यास, लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा इशारा आयुक्तांनी दिला.

कोविड सेंटरची गरज नाही
सध्या रुग्णवाढीचा वेग अधिक असला तरी, तुर्तास कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याची गरज नाही. जाकिर हुसेन आणि बिटको रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत. गरज भासल्यास, कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याबाबतचा विचार केला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

१५ दिवसात बिटको लॅब सुरू
सध्या लॅबमधून रिपोर्ट प्राप्त होण्यास बराच कालावधी लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन पुढच्या १५ दिवसात बिटको येथील लॅब सुरू केली जाणार आहे. या लॅबच्या माध्यमातून दिवसभरात दोन हजार चाचण्यांचे रिपोर्ट देणे शक्य होणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातीलही लॅब सुरु केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

हॉटस्पॉट निश्चित करणार
सध्या शहरात हॉटस्पॉट वाढत असल्याने त्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. हॉटस्पॉट निश्चित झाल्यानंतर त्याठिकाणी बॅरिकेडिंग तसेच सोसायटीला प्रतिबंधित क्षेत्राचे फलक लावले जाणार आहे. त्याचबरोबर रुग्णाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्यांचा शोध घेण्याचे कामदेखील केले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

५० हजार लसीची मागणी
ज्या भागात रुग्णवाढीचा दर अधिक आहे, त्याठिकाणी लसीकरण जास्त प्रमाणात केले जावे, असे केंद्राचे धोरण आहे. मात्र शहरात लसींचा तुटवडा असल्याने, ५० हजार लसींची मागणी केली आहे. त्यातील पाच हजार लसी पाठविण्यात आल्या असून, इतरही लवकरच प्राप्त होतील असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

राज ठाकरेंचा निर्णय वैयक्तिक
मनसेप्रमुख राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी मास्क घालणे टाळले होते. याबाबतच मनपा आयुक्तांना विचारले असता, ‘मास्क न घालण्याचा राज ठाकरे यांचा निर्णय वैयक्तिक होता. वास्तविक या परिस्थितीत सर्वांनीच मास्क घालायला हवा असे ते म्हणाले.

रुग्णवाढीचा वेग ४० टक्के
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाढीचा वेग तब्बल ४० टक्के इतका आहे. सुदैवाने रिकव्हरी रेट ९५ टक्के असल्याने डेथ रेट १.७३ टक्के इतका आहे. मात्र वाढती रुग्णसंख्या चिंता वाढविणारी असून, प्रशासनाने त्याबाबतच्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच वेळोवेळी त्याबाबतचे निर्णय घेतले जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
शहरातील उपलब्ध बेडची स्थिती
एकूण बेड – तीन हजार २८४
रुग्णांना दिलेले बेड – ३४७
शिल्लक बेड – २९३७
आयसीयू बेड – ५१५
रुग्णांना दिलेले बेड – १०७
शिल्लक बेड – ४०८ऑक्सिजन बेड – १२८८
रुग्णांना दिलेले बेड – २०८
शिल्लक बेड – १०८०

व्हेंटिलेटर बेड – २७१
रुग्णांना दिलेले बेड – ३२
शिल्लक बेड – २३९

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.