तर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्या सिनेमाच्या शुटिंगला रिपाईचे संरक्षण : रामदास आठवले

0

लोकराष्ट्र : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून मोदी सरकारवर टीका करताना महानायक अमिताभ बच्चन आणि खिलाडी अक्षय कुमार यांना इशारा दिला होता. मनमोहन सिंग सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलवरून टिवटिव करणाऱ्या या सेलिब्रिटींना आता बोलायला काय होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच अशा दुटप्पी सेलिब्रिटींचे सिनेमे यापुढच्या काळात महाराष्ट्रात चालू दिले जाणार नाहीत. तसेच शूटिंगही काँग्रेस पक्षाकडून बंद पाडली जाईल, असा इशारा दिला होता. नाना पटोले यांच्या या वक्त्यव्याचा भाजप नेत्यांकडून निषेध केला होता. तसेच त्यांच्यावर टीकाही केली होती. आता यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली असून, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्या सिनेमाच्या सुटींगला रिपब्लिकन पक्ष संरक्षण देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, ’अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात इंधन दरवाढीवर ट्विट करून विरोध दर्शवला होता. याचा अर्थ असा नाही की आजच्या इंधन दरवाढीवर पण ट्विट करावं. नाना पटोलेंनी अशी धमकी देणं चांगली गोष्ट नाही.’ डिझेल, पेट्रोल आणि गॅसची दरवाढ यामुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं आहे. ज्यावेळी मनमोहन सिंग यांचं सरकार होतं तेव्हा अमिताभ, अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून टिवटिव करायचे आणि टीका करायचे. आज ते का शांत आहेत?, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली होती. तसेच, ‘अमिताभ आणि अक्षय कुमार यांचे सिनेमे आणि शूटिंग महाराष्ट्रात चालू देणार नाही. ज्या पद्धतीने ते लोकशाही मार्गाने मनमोहन सिंग यांचं सरकार असताना ट्विट करत होते, त्याप्रमाणे आजही मोदी सरकारच्या देशविरोधी धोरणाच्या विरोधात त्यांनी आपली भूमिका मांडावी. अन्यथा महाराष्ट्रात सिनेमे आणि शूटिंग बंद पाडू अशी व्यवस्था करणार आहोत. असा यावेळी नाना पटोलेंनी इशारा दिला होता.

दरम्यान, नाना पटोले यांच्या या वक्तव्याचा भाजपकडूनही चांगलाच समाचार घेण्यात येत आहे. भाजप प्रवक्ते राम कदम यांनी नाना पटोले यांना महाराष्ट्र कोणाची जहागीरी नाही अशा शब्दात टीका केली आहे. तसेच महानायक अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांच्या सिनेमाचे चित्रिकरण जर कोणी बंद पाडण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता या संघर्षात रामदास आठवले यांनीही उडी घेतल्याने महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच पेटण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.