पंतप्रधानांना दोन तासही झोपू द्यायचे नाही…. विदर्भ दौऱ्यावर संजय राऊत कडाडले!

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार उत्तर दिले

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे अशा दिग्गजांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये शिवसेनेने मोठबांधणी सुरू केली असून, त्याची धुरा शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेल्या संजय राऊत यांच्या खांद्यावर दिली आहे. सध्या संजय राऊत तीन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असून, त्यांनी नागपूरमध्ये येताच भाजपवर टीकेची झोड उठवून दिली आहे.

त्यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ तास काम करतात, दोन तासच झोपतात. आतार तर ते दोन तासही झोप येऊ नये, यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या याच विधानाचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, ‘मोदी साहेब खूप काम करतात, ते फक्त दोन तास झोपतात हा चांगला प्रयोग आहे. मात्र आता उरलेले दोन तास सुद्धा त्यांना झोपू द्यायचे नाही असा बहुतेक महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी ठरवलेले आहे, त्यानुसार भाजपचे नेते कामाला लागले आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पक्षाचा विस्तार कोकण व्यतिरिक्त भागात झाला नाही, ही टीका होत असताना आता शिवसेनेनं पक्ष विस्तारासाठी कंबर कसली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू करा असे आदेश पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर, शिवसेनेचे सर्व खासदार आता पुढचे तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भ पिंजून काढणार आहेत. नागपूर या उपराजधानीच्या शहरात संजय राऊत यांच्यासह काही ज्येष्ठ मंडळी तळ ठोकून राहणार आहेत. तर शिवसेनेच सर्व खासदार तीन दिवस या दोन्ही विभागात फिरणार आहेत. त्यांच्यासोबत मुंबई-ठाण्यातील २०-२० कार्यकर्त्यांची टीमही असणार आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शिवसेना पक्षाचे संघटन बळकट व्हावं, आगामी लोकसभा, विधानसभा आणि लगचेच होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांत जोश निर्माण करावा आणि मार्गदर्शन करावं, तसेच स्थानिक चाचपणी करावी, हाही या दौऱ्यामागचा हेतू आहे. चार दिवसांनंतर हे सर्वजण मुंबईत परतणार असून, या भेटीचा अहवाल उद्धवजींना देणार असल्याची माहितीही राऊत यांनी दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.