सहा महिन्याच्या तीराला मिळाले नवे आयुष्य; १६ कोटींचे ‘ते’ इंजेक्शन दिले!

कोट्यावधी रुपयांचे इंजेक्शन देताच तीराच्या प्रकृतीत होतेय सुधारणा

0

मुंबई : दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या सहा महिन्याच्या चिमुरडीला अमेरिकेहून मागविण्यात आलेले तब्बल १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन दिले आहे. या इंजेक्शनमुळे तीरा कामत नावाच्या या चिमुरडीला नवे आयुष्य मिळणार असून, लवकरच ती या आजारातून बरी होणार आहे. जीन रिप्लेसमेंट उपचारांत हे औषध अतिशय महत्वाचे मानले जाते. ‘झोलजेन्स्मा’ असे या औषधाचे नाव आहे. तीरा पी. डी. हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहे.

तीरा या दुर्धर आजाराचे निदान झाल्यानंतर संपूर्ण देश तिच्या पाठीशी उभा राहिला. सर्वच स्तरातून तीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या जाऊ लागल्या. कोट्यावधीच्या या औषधावरील सीमा शुल्क माफ करण्यासाठी केंद्र सरकार धावून आले. तीराला लवकरात लवकर हे औषध मिळावे, अशी संबंध देशवाशियांची प्रार्थना होती. ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी अनेकांकडून प्रार्थना केली जात होती. अखेर तिला २६ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता हे इंजेक्शन दिले गेले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून, डॉक्टर तिच्या प्रकृतीतील सुधारणांवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, तीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे औषध गुरुवारी (२५ फेब्रुवारी) अमेरिकेतून मुंबईत आणण्यात आले. हिंदुजा रुग्णालयाकडे हे औषध देण्याचा परवाना आहे. तीराला हे औषध सलाईनमधून देण्यात आले. त्यानंतर तिला एक दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार इंजेक्शन दिल्याच्या काही तास डॉक्टरांनी तिच्या प्रकृतीतील सुधारणेवर बारीक लक्ष ठेवले होते. त्यानंतर शनिवारी तिला डिस्चार्जही देण्यात आला.

तीराला ‘स्पायनल मस्क्युलर एस्ट्रॉफी (एसएमए) या दुर्धर आजार झाल्याचे निदान झाले होते. या दुर्मिळ आजारामध्ये प्रोटीन तयार करण्यासाठी शरीरामध्ये जो जीन असणे अपेक्षित असतो, तो नसल्याने गुंतागुंत निर्माण होतो. या परिस्थितीत मज्जातंतू आणि स्नायू बळकटीकरणाची प्रक्रिया अतिशय मंदावते. परिणामी अन्न गिळणे, श्वास घेणे अवघड होते. तसेच इतर हालचालींवरही अनेक बंधने येतात. ही परिस्थिती टप्प्याटप्याने अधिक गुंतागुंतीची होत जाते. त्यामुळे या बाळाच्या शरीरातील जीनमध्ये प्रोटीन तयार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांची जीन थेरपी देणे आवश्यक असते.

दरम्यान, कोट्यावधी रुपयांचे हे औषध मिळविणारी तीरा हे दुसरे बाळ ठरले आहे. काही महिन्यांपूर्वीच मुंबईतीलच एका बाळाला हे औषध देण्यात आले होते. तर देशात आतापर्यंत एकुण ११ बालकांना हे औषध देण्यात आले आहे. तिराच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा व्हावी व पुन्हा तिला असे कुठल्या प्रकारचे लक्षणे जाणवू नये याकरिता संपूर्ण देशात प्रार्थना केली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.