‘‘आधी स्वत:चा पक्ष सांभाळा’’, मायावतींची राहुल गांधींवर टीका!

ईडी आणि सीबीआयच्या भीतीने मायावती यांनी निवडणुक लढवली नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

नुकत्याच पार पडलेल्या उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बसपा प्रमुख मायावती यांना मुख्यमंत्री करायची तयारी केली होती. पण ईडी आणि सीबीआयच्या भीतीने मायावती स्व: निवडणुक लढल्या नाहीत, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. आता राहुल यांच्या आरोपाला मायावती यांनी उत्तर दिलं आहे. ‘‘आधी स्वत:चा पक्ष सांभाळा’’ अशा शब्दात मायावती यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. उत्तरप्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत ४०३ पैकी काँगेसला दोन आणि मायावती यांच्या बसपाला एक जागा मिळाली आहे.

पत्रकार परिषद घेऊन मायावती यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिले. काँग्रेस सुरुवातीपासूनच घाणेरडे राजकारण करते. मी उत्तर दिले नाही, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे, हे चूक आहे. राहुल गांधी यांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही. काँग्रेसने इतर पक्षांची काळजी करण्यापेक्षा स्वतःची काळजी करावी.

निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी निकालांवर समीक्षा करायला हवी; मात्र असे बोलू नये. काँग्रेसने बसपासंदर्भात काहीही बोलण्यापूर्वी १०० वेळा विचार करायला हवा. भाजपाशी सामना करताना स्वतःची कामगिरी कशी राहिली हे काँग्रेसने बघावे, असा सल्ला मायावती यांनी दिला. राजीव गांधी यांनीही बसपाला बदनाम करण्यासाठी आणि कमकुवत करण्यासाठी कांशीराम यांना सीआयए एजंट म्हटले होते. आता त्यांचा मुलगाही त्यांच्याच मार्गावर चालतो आहे. खरे तर काँग्रेसलाच भाजपाच्या सेंट्रल एजन्सीची भीती वाटते, असे त्या म्हणाल्यात.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.