वडाळा गावातील विद्यार्थ्यांनी धरली वैज्ञानिकतेची कास, साकारले एकापेक्षा एक प्रकल्प ‘खास’

अटल टिंकरिंग लॅब : आबासाहेब थोरात व त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांमध्ये रूजविला वैज्ञानिक दृष्टीकोन

0

 नाशिक : एखादा वैज्ञानिक प्रकल्प साकारण्यासाठी त्याला आवश्यक असलेली साधनसामुग्री बघितली तरी, त्याचा वापर कसा असेल?, त्यामुळे काय होईल?, मनुष्य जीवनात ते कितपत प्रभावी ठरेल ?असे एका ना अनेक प्रश्न मनात येतात. मात्र वडाळा गावातील आदिवासी सेवा समिती संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ही साधनसामुग्री नुसती बघितली नाही, तर प्रत्यक्ष हाताळत एकापेक्षा एक आणि भविष्याचा वेध घेणारे प्रकल्प साकारण्याची किमया साधली आहे. 

निमित्त होते, निती आयोगाच्या ‘अट्टल टिंकरिंग लॅब’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे. सध्या हा प्रकल्प राज्यातील कानाकोपऱ्यात राबविला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच वैज्ञानिक दृष्टीकोन त्यांच्यात विकसित व्हावा तसेच अभियांत्रिकीसह कुशल कामगार होण्याच्या दृष्टीने त्यांच्यातील गुणवत्ता वाढीस लागावी हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाची मुख्य धुरा युवा उद्योजक तथा इलाईट सर्टिफिकेशन ॲण्ड इनोव्हेशन सोल्युशनचे संचालक आबासाहेब थोरात यांच्या खाद्यांवर असून, ते अधिकाधिक विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागण्यासाठी धडपड करीत आहेत.

सध्या नाशिक शहरातील विविध माध्यमिक शाळांमध्ये या प्रकल्पाअंतर्गत ‘अट्टल टिंकरिंग लॅब’ देण्यात आल्या आहेत. या लॅबचा प्रत्यक्ष वापर कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण शहरातील वडाळा या वस्तीत असलेल्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयात आयोजित केले असता, विद्यार्थ्यांनी अत्यंत दुरगामी दृष्टीकोनातून विविध महत्त्वांच्या प्रकल्पांची निर्मिती केली. या प्रशिक्षणात इयत्ता आठवी ते दहावी अशा ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी लॅबमध्ये उपलब्ध असलेल्या विविध साहित्यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे असे प्रकल्प साकारले.

या विद्यार्थ्यांना आबासाहेब थोरात आणि त्यांच्या टीमने प्रशिक्षण दिले. ड्रोन उडविण्यासोबतच स्मार्ट प्रिंटर व इतर साधनसामुग्रीची इत्यंभूत माहिती दिली. दरम्यान, या प्रशिक्षण कार्यशाळेत संचालक साळुंके, मुख्याध्यापक डी. एस. अहिरे, पर्यवेक्षक एम. यु. निकम यांनी विद्यार्थ्यांना अट्टल टिंकरिंग लॅबचे महत्त्व सांगितले. यावेळी मार्गदर्शक दीपक अचलखांब, अश्विन रघुवंशी, मुकेश देवांगन यांनी विद्यार्थ्यांकडून प्रकल्प तयार घेतले. तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत आबासाहेब थोरात यांनी प्रत्येक दिवशी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक एम. आर. बाविस्कर, प्रतिभा बोरस्ते यांनी विद्यार्थ्यांच्या या प्रकल्पात मदत केली.

यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या विषयांवर आधारित प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली. जसे की, स्मार्ट सिटी या प्रकल्पाअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अंधार पडताच आपोआप लाइट सुरू होणे, समोर वाहन आल्यास वाहन आपोआप थांबणे, पावसाची पूर्वकल्पना देणारे यंत्र, घरात अथवा दरवाजाबाहेर कोणी थांबले असल्यास त्याबाबत बझर वाजवणारे यंत्र, डिप्स्ले बोर्ड आदी प्रकल्प साकारण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.