दिलासा : स्टीलचे दर ६१ हजारावरून ४९ हजार प्रतिटनावर

आता स्टील उत्पादकांची मात्र चिंता वाढली

0

नाशिक : स्टील दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या उद्योजक व बांधकाम व्यावसायिकांना स्टील दर झपाट्याने खाली आल्याने उद्योजकांसह, बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. ६१ हजार हा विक्रमी आकडा गाठणाऱ्या स्टीलचे १२ हजारांनी दर कोसळले आहेत. त्यामुळे आता स्टील उत्पादकांची चिंता वाढली आहे. त्यातच सरकारने वीजबिलातील सवलतीही बंद केल्याने, उत्पादकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये स्टीलच्या दरात झपाट्याने वाढ झाली होती. पुरेसा कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने, मागणीच्या तुलनेत उत्पादन घटले होते. परिणामी स्टील उत्पादकांनी दरवाढ केल्याने, दर ६१ हजार प्रतिटनावर गेले होते. यामुळे उद्योग आणि बांधकाम क्षेत्र अडचणीत सापडले होते. अशात या दरवाढीवर नियंत्रण आणले जावे अशी मागणी जोर धरू लागली. दरम्यान, विक्रमी दराचा टप्पा गाठणाऱ्या स्टीलचे दर झपाट्याने खाली आले आहेत. तब्बल १२ हजारांनी दर कमी झाले असून, आता ४९ हजार प्रतिटन इतके झाले आहेत. त्यामुळे आता उत्पादकांची चिंता वाढली आहे.

मध्यंतरी सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेल्या तीन टक्के सवलतीचा रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा फायदा झाला. त्यामुळे बांधकाम क्षेत्र वेगाने वाढले आहे. तसेच बांधकाम क्षेत्रातून स्टीलला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने, स्टील उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात ऑडर्स स्विकारल्या आहेत. मात्र गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये स्टीलच्या दरात सातत्याने घसरण झाल्याने उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.

कही खुशी कही गम
दरम्यान, स्टीलच्या किंमती पुन्हा एकदा आटोक्यात आल्याने उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे बांधकाम क्षेत्रही सुखावले आहे. मात्र स्टील उत्पादक आता अडचणीत सापडले आहेत. नाशिक जिल्ह्याला मुख्य पुरवठादार असलेल्या जालना जिल्ह्यातील उत्पादकांमध्ये काहीसे निराशेचे वातावरण आहे.

दुहेरी फटका
चालू महिन्यापासून स्टील उत्पादकांच्या वीज बिलातील सवलतीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादकांची चिंता वाढली आहे. तसेच जीएसटी विभागाचाही सिसेमिरा असल्याने स्टील उत्पादकांना दुहेरी फटका साेसावा लागत आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.