मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ : आता लिव्ह इन पार्टनरने केली पोलीस महासंचालकाकडे तक्रार!

0

मुंबई : रेणू शर्मा लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाचा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात लिव्ह इन पार्टनर करुणा शर्मा यांनीच राज्याचे पोलिस महासंचालक यांच्याकडे तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. करुणा यांनी बुधवारी केलेल्या तक्रारीत मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. करुणा यांनी बुधवारी वकिलासोबत प्रत्यक्ष जाऊन पोलिस महासंचालकांकडे लेखी तक्रार केली. त्यात मंत्री धनंजय मुंडे हे आपल्या दोन्ही मुलांना भेटू देत नाहीत. फोनवर बोलूसुद्धा देत नाहीत. चित्रकूट या शासकीय बंगल्यात आपल्या मुलांना गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी डांबून ठेवल्याचे म्हटले आहे.

त्यांनी म्हटले की, मी २४ जानेवारी रोजी मुलांना भेटण्यास गेले असता ३० ते ४० पोलिसांनी मला भेटू दिले नाही, असे आरोप करुणा यांनी केले आहेत. धनंजय हे नशेबाज आहेत. चित्रकूट बंगल्यावर एकही महिला वास्तव्यास नाही. माझी मुलगी १४ वर्षांची आहे. मला तिची फार काळजी वाटते. माझ्या दोन्ही मुलांना ते माझ्याविरोधात भडकावत आहेत. माझी दोन्ही मुले चित्रकूट बंगल्यावर सुरक्षित नाहीत. माझ्या मुलांसंदर्भात काही वाईट घडल्यास त्याला मुंडे हेच जबाबदार असतील, असा इशारा करुणा यांनी तक्रारीत दिला आहे. आमदारकी रद्द करण्याची मागणी  तसेच धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी. यापुढे त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे. मुंडे यांच्या विरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा आपण आझाद मैदान, मंत्रालय किंवा चित्रकूट बंगला येथे २० फेब्रुवारीनंतर बेमुदत उपोषणास बसणार आहोत, असे करुणा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मुंडे यांच्या विरोधात भादंवि कलम ३७६, ३७७, ४२०, ४७१, ३२४, ५०६ (२) घरगुती हिंसाचार कायदा १८, १९ आयटी कायदा दाम्पत्य अधिकार कलम ९ अन्वये तक्रार दाखल करावी, असे म्हटलेले आहे. तसेच या तक्रारीत त्यांनी करुणा धनंजय मुंडे असे नाव वापरले आहे. धनंजय मुंडे यांनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार डिसेंबर महिन्यात करुण यांची धाकटी बहीण रेणू शर्मा यांनी पोलिसांत दिली होती. नंतर त्यांनी तक्रार मागे सुद्धा घेतली होती. त्यानंतर प्रकरण संपुष्टात आल्याचे वाटत असतानाच करुणा यांनी तक्रार केली आहे. मुंडे-करुणा शर्मा यांच्याविषयीचा वाद न्यायप्रविष्ट असून उच्च न्यायालयाने या वादावर तोडगा काढण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती व्हि. के. ताहिलरामाणी यांची नेमणूक केली आहे. याप्रकरणी दोन बैठका झाल्या असून तिसरी बैठक १३ फेब्रुवारी रोजी निश्चित झाली आहे. त्यामुळे प्रतिवादीस न्यायिक प्रक्रियेत रस नसून केवळ मिडीया ट्रायल चालवून बदनामी करण्याचा हेतू दिसत आहे,त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य नाही, असा खुलासा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.