चांदीच्या दरातील घसरण सुरूच, बुधवारी प्रतिकिलो ६९ हजार ६०० रुपये दर

0

नाशिक :  १ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात आयात शुल्कात कपात केल्याने, सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोन्यामध्ये प्रतितोळा १६०० रुपये दर घसरल्यानंतर चांदीचेही दर कमालीचे खाली आले आहेत. बुधवारी चांदीचा दर प्रतिकिलो ६९ हजार ६०० रुपये इतका होता. दर घसरत असल्याने चोख चांदी खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.

जागतिक बाजारात सोन्याचे दर १८४७ डॉलर प्रति औंसपर्यंत तर चांदीचे दर २७.५० डॉलर प्रति औंस कमी झाले. परिणामी देशातही सोने-चांदीचे दर सातत्याने कमी होत असून, अमेरिकेने जाहीर केलेले पॅकेज प्रत्यक्षात लवकर येण्याची शक्यता कमी असल्याने तसेच काही गुंतवणूकदारांचा कल नफा काढून घेण्याकडे असल्याने सोन्याचे दर कमी होत आहेत. त्यातच अर्थसंकल्पामध्ये सोने-चांदीवरील आयात शुल्क कमी केल्याने हे दर अजून कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेअर बाजार दोन दिवसांपासून उच्चांकी पातळी गाठत असल्याने गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळत असल्याने सोन्याचे दर कमी होत आहेत. चांदीला उत्पादन क्षेत्रातून मागणी अधिक आहे, तरीदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे चांदीचे दर कमी होत आहेत.

शहरातील चांदीचे दर (प्रतिकिलो)
1 फेब्रुवारी – 73 हजार
2 फेब्रुवारी – 71 हजार
3 फेब्रुवारी – 69 हजार
4 फेब्रुवारी – 68 हजार
5 फेब्रुवारी – 67 हजार 300
6 फेब्रुवारी – 68 हजार 700
7 फेब्रुवारी – 68 हजार 700
8 फेब्रुवारी  – 69 हजार 200
9 फेब्रुवारी – 70 हजार 200
10 फेब्रुवारी – 69 हजार 600

चांदीत गुंतवणुकीची सर्वोत्तम संधी
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीच्या किमती कमी झाल्याने दर घसरले आहेत. त्यामुळे चांदीत गुंतवणूक करण्याची हिच योग्य वेळ आहे. कारण 2021 या वर्षात चांदीच्या दरात मोठी वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळत असलेल्या संकेतानुसार चांदीचा दर एक लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
– चेतन राजापूरकर, संचालक, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, इंडिया बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.