संभाजी भिडेंनी स्वत: मास्क घातला नाहीच, शिवाय शिवसेनेच्या आमदारालाही मास्क काढायला सांगितला

इतरही एका व्यक्तीला संभाजी भिडे यांनी मास्क काढायला सांगितला

0

सांगली : राज्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, प्रत्येकांनीच नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग या दोन गोष्टींचे तर प्रत्येकांनीच कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. मात्र पुढारी मंडळीच या नियमांना केराची टोपली दाखवित असल्याने, सर्वसामान्यांनी त्यांचे अनुकरण केल्यास नवल वाटू नये. दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांनी शक्तीप्रदर्शन करताना मोठ्या संख्येनी कार्यकर्त्यांना जमवित मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ फासला होता. आता त्यापाठोपाठ सांगलीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभागी भिडे अशीच काहीशी कृती करताना दिसून आले. त्यांनी स्वत: तर मास्क घातला नव्हताच शिवाय उपस्थित आमदारालाही मास्क काढायला सांगितला. त्यांच्या या कृत्यामुळे सर्वत्रच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर काहींकडून नियम उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी केली जात आहे.

त्याचे झाले असे की, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात संभाजी भिडे उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना उद्धाटनाआधी तोंडावरील मास्क काढायला लावला. करोना होत नाही मास्क काढा असं सांगितल्यावर बाबर यांनीदेखील मास्क काढून टाकला. विशेष म्हणजे यावेळी संभाजी भिडेंच्या मागे चांगलीच गर्दी होती. संभाजी भिडेंसहित तिथे उपस्थित एकानेही मास्क घातलेला नव्हता. संभाजी भिडे यांनी फक्त आमदारच नाही तर तिथे उपस्थित आणखी एका व्यक्तीलाही मास्क काढायला सांगितला. त्यानंतरच अनिल बाबर यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आलं. संभाजी भिडे यांची ही कृती नियमांची ऐशीतैशी करणारी असल्याने सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या या प्रतापाचा खानापूर आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी निषेध केला. याविषयी त्यांनी म्हटले की,  खानापूर मतदारसंघाच्या आळसंद गावात एका दुकानाच्या उद्दाटन कार्यक्रमात संभाजी भिडे उपस्थित होते. राज्यात करोना रुग्ण वाढत असताना आणि सरकारने मी जबाबदार मोहीम सुरु केली असतानाही संभाजी भिडेंनी स्वतः मास्क न घालता आमदाराला मास्क काढण्याची सूचना दिली म्हणून संभाजी भिडे यांच्यावर राज्य सरकारने तात्काळ कारवाई करायला हवी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.