साहित्य संमेलन : सोळा आमदारांकडून दीड कोटीचा निधी, बँकाही करणार मदत

0

नाशिक : पुढील महिन्यात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. जिल्ह्यातील १६ आमदारांनी त्यांच्या आमदार निधीतून १ कोटी ४५ लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. तसेच विविध संघटना, बँका, उद्योग क्षेत्र, हॉटेल्स‌नेही संमेलनासाठी खारीचा वाटा उचलण्याची तयारी दर्शविली आहे.

साहित्य संमेलनासाठी आमदार निधीतून १० लाखांचा निधी देणाऱ्यांमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ना. नीलम गोऱ्हे, डॉ. सुधीर तांबे, हिरामण खोसकर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, राहुल ढिकले, दिलीप बनकर, नितीन पवार, माणिक कोकाटे यांचा समावेश आहे. तसेच डॉ. राहुल आहेर, सुहास कांदे, दिलीप बोरसेंनी प्रत्येकी पाच लाखांचा निधी देण्यास सहमती दर्शविली. दरम्यान, आमदार दराडे बंधू व मालेगावच्या आमदारांशी निधी देण्याबाबत चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींसोबत विविध संस्था व संघटना, तसेच व्यक्तीही मदतीसाठी सरसावल्या आहेत. रामबंधू मसाले समूहाचे हेमंत राठी यांनी सारस्वत बँकेतर्फे ७ लाख व रामबंधू मसाले समूहाकडून 3 लाख रुपये अशी एकूण 10 लाखांची मदत जाहीर केली. संदीप फाउंडेशनने व भुजबळ नॉलेज सिटी संस्थेने प्रत्येकी 200 पाहुण्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. याशिवाय हॉटेल सिटी प्राईड, हॉटेल सूर्या, हॉटेल हॉलिडे इन, हॉटेल एमराल्ड पार्क यांनीही येणाऱ्या काही पाहुण्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

साहित्य संमेलनाच्या निधी संकलनासाठी जिल्हाभरात चित्ररथ फिरवण्यात येणार असल्याची माहिती जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली. याद्वारे ५० रुपयांपासून मदत करता येईल. तसेच नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने आर्थिक मदतीसाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.