इंडिपेंडन्स बँकेवर आरबीयाचे निर्बंध, सहा महिन्यांपर्यंत पैसे काढता येणार नाही

ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता

0

नाशिक : रविवार पेठेतील इंडिपेंडन्स को. ऑप. बँकेवर रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाने पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध लादल्याने, सभासद व गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. आरबीआयच्या या निर्बंधानुसार सभासदांना पुढील सहा महिने कुठलेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.

आरबीआयने याबाबत निवेदन जाहीर केले असून त्यामध्ये म्हटले की, ९९.८८ टक्के ठेवी या पूर्णपणे ‘ठेव विमा आणि पत हमी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) या विमा योजनेत समाविष्ट आहेत. या विमा योजनेअंतर्गत बँकेच्या प्रत्येक ठेवीदारास ‘डीआयसीजी’कडून पाच लाख रुपयांपर्यंतची विमा हक्क रक्कम मिळण्याचा अधिकार आहे. पुढील सहा महिने निर्बंध लागू असल्याने या काळात ठेवीदारांना बँकेतून बचत किंवा चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. बँकेची सद्यस्थितीतील रोखीचे परिस्थिती पाहता ठेवीदारांना बचत खेत, चालू खात किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या खात्यातून रक्कम काढण्याची परवानगी नाही. आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय या काळात बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्जाचे वितरण करता येणार नाही. तसेच कुठल्याही प्रकारच्या ठेवी स्विकारता येणार नाहीत किंवा वितरीत करता येणार नाही. या निर्बंधासह बँक सुरू राहणार आहे.

कर्जफेड करण्याची मुभा
बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत. या परिस्थितीत सुधारणा झाल्यास हे निर्बंध शिथील केले जाणार असल्याचे ‘आरबीआय’ने निवेदनात म्हटले आहे. हे निर्बंध लागू असताना ठेवीदार कर्जफेड करू शकतात. पण त्यासाठी त्यांना काही अटी-शर्थींचे पालन करावे लागणार आहे.

कर्जही देता येणार नाही
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरबीआयच्या पूर्व मान्यतेशिवाय कोणतेही कर्ज देऊ शकणार नाहीत किंवा नूतनीकरण करणार नाहीत. या व्यतिरिक्त ते कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाहीत किंवा कोणतीही रक्कम देऊ शकणार नाहीत. बँक निर्बंधासह आपला बँकिंग व्यवसाय चालवत राहील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

 

आरबीआयने बँकेवर निर्बंध लादले आहेत. मात्र यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. थकबाकीदारांकडून वसुलीच्या माध्यमातून भागभांडवल वाढवून ठेवीदारांचे नुकसान टाळण्याचा बँकेचा प्रयत्न असेल. ठेवीदारांनी सकारात्मकता ठेवावी.
– सीमा हिरे, उपाध्यक्षा, इंडिपेंडन्स बँक

इंडिपेन्डस‌ बँकेवर निर्बंध आणण्याबाबतची आरबीआयची नोटीस दुपारी चार वाजता प्राप्त झाली आहे. त्यानुसार आम्ही कारवाई केली असून, बँकेला नोटीस सुपूर्द केली आहे. आरबीआयच्या निर्देशानुसार कारवाई केली जाईल.
– सतीश खरे, जिल्हा उपनिबंधक

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.