रुबीना दिलैक ठरली ‘बिग बॉस-१४’ची विजेती, राहुल वैद्य उपविजेता!

0

लोकराष्ट्र : अनेक घडामोडींमुळे चर्चेत राहिलेल्या बिग बॉस सीजन १४ चा विजेता अखेर घोषित करण्यात आला आहे. नुकत्याच बिग बॉसच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. बिग बॉस १४ च्या सीजनमध्ये अभिनेत्री रुबीना दिलैक हिने बाजी मारली असून, ती या पर्वाची विजेती ठरली आहे. अत्यंत अटीतटीच्या या लढतीत चाहत्यांनी रुबीनाला सर्वाधिक मते देत विजयी केले आहे. तर गायक राहुल वैद्य हा उपविजेता ठरला आहे.

३ ऑक्टोंबर २०२० ला बिग बॉस-१४ या रिॲलिटी शोचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आहे. पुढे हा शो तब्बल १४० दिवस चालला. बिग बॉसच्या आतापर्यंतच्या पर्वातील १४ पर्व सर्वाधिक दिवसांचे ठरले. १२ स्पर्धकांपासून सुरु झालेल्या या पर्वात अनेक नाट्‌यमय घडामोडी घडल्या. मध्येच काही स्पर्धकांना वाइल्ड कार्ड एन्ट्री दिली गेली. त्याचबरोबर काही जुन्या स्पर्धकांनाही या शोमध्ये उतरविण्यात आले. मात्र सुरुवातीपासूनच रुबीनाने या सर्वांना टक्कर देत स्वत:ला सरस ठेवले.

महत्त्वाची बाब म्हणजे या शोमध्ये रुबीनाचा पती अभिनव शुक्ला हा देखील सहभागी झाला होत्या. या दोघांच्या जोडीने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. अभिनव रुबीनाची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. सुरुवातीला अभिनव फारसा ॲक्टिव्ह नव्हता. त्यानंतर मात्र तोही विजेत्यांच्या रांगेत उभा होता. मात्र त्याला घरातील सदस्यांना सपोर्ट करायला आलेल्या सेलिब्रिटींनी नॉमिनेट केल्याने, त्याला विजेतेपदाच्या काही अंतरावरच शो सोडावा लागला. दरम्यान, रुबीनाने मात्र आपला परफॉर्मन्स कायम उजवा ठेवला. ती संपूर्ण शोदरम्यान, आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. संपूर्ण पर्वात ती चांगल्या गोष्टींसाठी लढत राहिली. तिची हीच बाब प्रेक्षकांना भावली.

बिग बॉसच्या घरात रुबीनाने अनेकदा स्पर्धकांच्या निर्णयाला विरोध केला. तर अनेकदा योग्य निर्णयाच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. रुबीना तिच्या परफॉर्मन्समुळे कायम चर्चेत राहिली. सोशल मीडियावरुन चाहत्यांनी रुबीनाला कायम पसंती दिली. दरम्यान, ग्रॅण्ड फिनालेमध्ये रुबीना दिलैकसह राहुल वैद्य, निकी तांबोली, अली गोनी आणि राखी सावंत यांनी बाजी मारली होती. अखेरच्या दिवशी राखीने १४ लाख रुपये स्विकारत शोमधून माघार घेतली. त्यानंतर अली गोनी बाहेर पडला. तसेच काही वेळातच निकीलाही बाहेर यावे लागले.

अखेर राहुल आणि रुबीना यांच्यात टक्कर झाली. दोघेही विजेतेपदाचे दावेदार समजले जाऊ लागल्याने, प्रेक्षक कोणाला पसंती देतील याकडे लक्ष लागून होते. अखेर रुबीनाने बिग बॉसच्या १४ व्या सीजनच्या विजेतेपदाच्या ट्राफीवर आपले नाव कोरले. तर राहूल वैद्य उपविजेता ठरला. संपूर्ण पर्वात राहुल आणि रुबीना यांच्यात चुरस बघायला मिळाली. दोघेही नेहमीच एकमेकांच्या समोर उभे ठाकताना दिसले. त्यामुळे दोघेच विजेतेपदाचे कट्टर दावेदार असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यात रुबीनाने बाजी मारली.

या विजेतेपदासह तिने ३६ लाख रुपयांचे बक्षिसही मिळविले. या विजयानंतर रुबीनाने सोशल मीडियावरुन सर्व चाहत्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केलाय. सलमान खानने विजेत्याचं नाव घोषित करण्याआधी सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली होती. राहुल वैद्य की रुबीना याकडे साऱ्यांच लक्ष होतं. मात्र या प्रवासात उत्तम कामगिरी करत रुबीनाने विजेते पदाचा मान पटकावला. अनेक मालिकांमधून रुबीनाने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.