राज ठाकरेंमुळेच कोरोनाचा संसर्ग वाढला, वकिलाची पोलिसात तक्रार

0

औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा कहर वाढत असला तरी, मनसेप्रमुख राज ठाकरे मास्क न घालताच राज्यात फिरत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी इतरांनाही मास्क न घालण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरेंच्या याच आवाहनामुळे आता राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची तक्रार ॲड. रत्नाकर चौरे यांनी पोलिसात दिली आहे. औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात ही तक्रार दिली आहे.

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांसमोर येऊन मास्क घालत नसल्याचे सांगितले होते. तसेच नुकतेच नाशिक दौऱ्यावर असतानाही त्यांनी मास्क घालण्यास नकार दिला होता. त्याचबरोबर माजी महापौर अशोक मुर्तडक यांनाही मास्क न घालण्यास सांगितले होते. राज ठाकरे यांच्या या कृतीमुळे इतरही लोक मास्क घालणे टाळत आहेत. परिणामी कोरोनाचा कहर वाढत असल्याचा तर्क ॲड. चौरे यांनी लावला आहे.

दरम्यान, चौरे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली असून, राज ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. सध्या राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात राज्य शासन प्रशासन कोरोनाचे नियम पाळण्याविषयी जनजागृती करत आहे तसंच नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्यास सांगत आहे. अशा काळात एखादा जबाबदार नेता अशा प्रकारचं आवाहन करतो, तर लोक त्याला का फॉलो करणार नाहीत, असा प्रश्न यानिमित्ताने त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे म्हणाले होते…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावले नव्हता. यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं होतं. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ‘त्यांना माझा नमस्कार सांगा,’ असे उत्तर दिले होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.