नियोजित वेळेच्या तासभर अगोदरच उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला हजर, अधिकाऱ्यांची धावपळ!

0

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नेमहीच चर्चेत असतात. वक्तशीरपणा या त्यांच्या कामातील खूपच महत्त्वाचा भाग ठरला आहे. सकाळपासूनच ते कामाला सुरुवात करतात. वेळेवर हजर राहून कामे मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे मात्र अधिकाऱ्यांची नेहमीच धांद उडताना बघावयास मिळाले आहे. आज पुण्यात असाच प्रकार समोर आला असून, अजित पवार यांच्या बैठकीला तासभर अगोदर येण्यामुळे अधिकाऱ्यांची पुर्ती त्रेधातिरपट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.

त्याचे झाले असे की, राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा डोके वर काढू लागल्याने पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलाविली होती. पुण्यात कोरोनाचे संकट पुन्हा उभे ठाकणार नाही, यासाठी त्यांनी आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत ते आढावा बैठक घेणार होती. त्यातच पुण्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याची भीती व्यक्त केली जात असल्याने, त्याबाबतची खात्रीशीर माहिती काय? हे जाणून घेण्यासाठी पालकमंत्री बैठकीला येणार होते.

ही बैठक सकाळी ९ वाजता सुरू होणार होती. त्यामुळे अधिकारी त्यावेळेनुसार तयारी होते. मात्र पालकमंत्री अजित पवार हे सकाळी ८ वाजताच बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. ते नियोजीत वेळेच्या एक तास अगोदरच दाखल झाल्याने अधिकाऱ्यांची मात्र पुर्ती धांदलच उडाली. त्यामुळे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी धावपळ करीत बैठकीचे ठिकाण गाठले. यावेळी पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना काय काय उपाययोजना करता येतील याबाबतच्या सूचना दिल्या.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दैनंदिन कामाला सुरुवातच पहाटेपासून होते. त्यांना पहाटे उठण्याची सवय असून, हे गेल्या कित्येक वर्षांपासून ते त्याचे पालन करीत आहे. एका कार्यक्रमात त्यांनी याबाबतचा खुलासा करताना सांगितले होते की, ‘सकाळी लवकर उठण्याची सवय आजोबांची नाही तर चुलत्याची (शरद पवार) लागली आहे. आम्ही जसं बघतोय तसं चुलते २७ वर्षांचे असताना सकाळी सातला कामाला लागायचे. रात्री दोनला आले, तरी सकाळी सातला काम सुरूच. आता वय वर्ष 80 पूर्ण झालं, तरी देखील आजही सकाळपासून कसं साहेब काम करत असतात, हे आपण पाहतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.