पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी अश्रू ढाळावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

आढावा बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये आले असता, त्यांनी विविध घडामोडींवर पत्रकारांशी संवाद साधला

0

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत अश्रू ढाळल्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी अश्रू ढाळायला हवेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. नाशिक येथे विभागीय आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांचा समाचार घेतला. 

शेतकर्‍यांना बिनव्याजी पीककर्ज नाही
राज्यातील शेतकर्‍यांना तीन लाखांपर्यंतचे बिनव्याजी पीककर्ज मिळत नाही. याला केवळ कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांतील शेतकर्‍यांचा अपवाद आहे. तेथील जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने त्यांनी अशी योजना सुरू केली आहे. मात्र, राज्यात पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सुरू असून, त्या अंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जावर केवळ दोन टक्के व्याजदर आकारला जातो, अशी माहिती ना. पवार यांनी दिली.

राज्यपालांविरोधात न्यायालयात जाण्याची वेळ येणार नाही
बहुमतात असणार्‍या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटची मंजुरी घेऊन आणि सर्व नियमांचे पालन करून विधान परिषदेसाठी बारा नावांची शिफारस केली आहे. यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालांना असून, ते लवकरच सकारात्मक पाऊल उचलतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याची वेळ येणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
विधान परिषदेच्या नव्या सदस्यांची नावे जाहीर करण्यास राज्यपालांकडून होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर ना. पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, विधान परिषद निवडीसाठीच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटने राज्यपालांना बारा नावे कळवली आहेत. आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. राज्यपाल लवकरच ही नावे जाहीर करतील, आम्हाला न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देणार नाही, असे वाटते. तसेच राज्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन केवळ आरोग्य आणि पोलीस विभागातच भरती करण्याची परवानगी दिली आहे. अन्य विभागांत अत्यावश्यक असेल तरच भरतीची परवानगी दिली जाणार आहे. अन्यथा तेथे कंत्राटी पद्धतीने कामगार भरती करण्याचा शासनाचा विचार आहे, अशी माहिती ना. पवार यांनी दिली.

निवडणुका ईव्हीएमद्वारेच
राज्यातील निवडणुका यापुढे मतपत्रिकांद्वारे होतील, या चर्चेत तथ्य नाही. निवडणुका ईव्हीएमद्वारेच घेतल्या जातील, असे ना. पवार यांनी स्पष्ट केले. ईव्हीएममुळे पराभूत उमेदवार आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना मशीनमध्ये घोटाळा झाला असे म्हणण्याची एक संधी मिळत असते. ते आपल्या पराभवाचे खापर व्होटिंग मशीनवर फोडून मोकळे होतात. पण, प्रत्यक्षात असे काही होत नाही. त्यात फेरफार करता येत नसल्याचेही ते म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच
विधानसभा अध्यक्षपद ठरल्याप्रमाणे काँग्रेसकडेच राहील. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या पदासाठी दावा केलेला नाही. काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद दिले जाईल, ही बातमीही चुकीची असल्याचे ना. पवार म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.