बदनामी थांबवा अन्यथा आम्हालाच आत्महत्या करावी लागेल, पूजा चव्हाणच्या वडिलांचा इशारा

0

बीड : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वादाला सुरुवात झाली आहे. भाजपकडून संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा ही मागणी सातत्याने केली जात असल्याने, या प्रकरणाला वेगळेच वळण मिळत आहे. त्यातच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करीत असल्याने महाविकास आघाडीवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पूजा चव्हाणच्या परिवाराने प्रथमच याप्रकरणी भावनिक प्रतिक्रिया देत आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

त्यांनी म्हटले की, ‘पूजाची चाललेली बदनामी थांबली नाही, तर मला कुटुंबासोबत आत्महत्याच करावी लागेल’ अशा शब्दात पूजाच्या वडिलांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भावना व्यक्त केली आहे. यावेळी पूजाची आई आणि तिच्या लहान बहिणीनेही तिची बदनामी करणे थांबवा अशी मागणी केली आहे. आम्ही कसंतरी सावरत आहोत. एकेक दिवस मागे टाकत आहोत. तेवढ्यात नवीन काहीतरी टीव्हीवर दाखवतात. नवीन फोटो जुळवतात. माझी मुलगी राजकीय कार्यकर्ती होती हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यांचं काम करत होती. तिचे कितीतरी फोटो आहेत. मग एकाच व्यक्तीसोबत का फोटो दाखवले जातात? पुरावे नसताना फक्त फोटो जोडून बदनामी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले. 

त्याचबरोबर तिला न्याय मिळायलाच हवा. माझी एक मुलगी गेली. पण हे दाखवत आहेत, ते पाहून माझ्या दुसऱ्या मुलीशी कोण लग्न करेल? माझ्यासमोर दोनच पर्याय आहेत. एक तर मुलीसोबत कोर्टासमोर जाऊन आत्महत्या करायची किंवा या सगळ्यांबद्दल न्यायालयात केस दाखल करायची, अशी भावनिक प्रतिक्रिया पूजाच्या वडिलांनी व्यक्त केली. यावेळी पूजाच्या लहान बहिणींनेही परखड प्रतिक्रिया नोंदविताना हे सर्व बंद करा, असे म्हटले आहे. ती म्हणाली की, या बदनामीमुळे माझ्या आई-वडिलांना काही झालं, तर तुम्ही माझं पालन-पोषण करणार आहात का? माझी जबाबदारी तुम्ही घेणार का?  पूजा अकरावीसून राजकारणात आहे. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यासोबत तिने काढलेले फोटो व्हायरल का होत नाहीत? त्या पुरूष नाहीत म्हणून का? असाही प्रश्न  पूजाची लहान बहिण दियाने विचारला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.