अभ्यासाचे ‘आऊटसोर्सिंग’

0

कोरोना संचारबंदिमुळे आता लोक मुलांचा अभ्यास घेण्याचे कामही ‘आऊटसोर्स’ करू लागले आहेत. वास्तविक सोशल डिस्टंसिंगमुळे पालकांचा घरात राहण्याचा कालावधी वाढला आहे परंतु त्यांचा हा वेळ ते मुलांशी संवाद साधण्यासाठी किती देतात हा मोठा प्रश्न आहे. पालकांचे असे दुर्लक्ष, बेफिकिरी किंवा बिनधास्तपणा हा थेट मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची वाढ खुंटण्यास कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे पालकांनी आपल्या समस्यांमधून, संघर्षातून थोडा वेळ काढून आपल्या मुलांनाही कोरोनाकाळात ध्येयप्रवासाचा वेग सांभाळण्यासाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे.

हल्ली माझ्याकडे जेव्हा लोक ‘विद्यार्थीसमस्या’ व समुपदेशन घ्यायला मुलांना घेऊन येतात तेव्हा असे लक्षात येते की समस्येचे खरे कारण हे विदयार्थी नसून ‘कौटुंबिक कलह’, वैयक्तिक ताणतणावांचे व्यवस्थापन न करता येणे व त्यातून होणारी चिडचिड हे असते. कोरोनामुळे सामाजिक मनोबल कमी होण्याच्या या काळात आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे. याचा खोलवर परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होत असून, वरवर दाखवत नसली तरी, आपली मुलं आतून यामुळे भेदरू लागली आहेत. आपल्या मुलांचे मनोबल टिकून राहावे हे ज्या पालकांना खरोखर वाटते, त्यांनी आता मुलांसोबतचा संवाद वाढला पाहिजे व आपण स्वत:हून घरच्या शिक्षकांची भूमिका निभावली पाहिजे.

शिक्षणाचे ऑनलाइन आऊटसोर्सिंग म्हणजे काय ? तर आपल्या मुलाचे अभ्यासाचे कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला देऊन आपली जबाबदारी बुद्धिमान पद्धतीने झटकणे !!! हे झाले ‘पॅसिव्ह लर्निंग’ पण आता गरज आहे ती ‘अॅक्टिव लर्निंग’ ची म्हणजे स्वतः पालक सहभागाची. ऑनलाईन शिकवणीच्या वर्गामध्ये पाठ केलेली प्रश्न उत्तरे परीक्षेत गुण मिळवून देतात किंवा उत्तीर्ण करत असतील कदाचित; पण तो योग्य अभ्यास असतोच असे नाही. विद्यार्थ्याला विषयाचे आकलन झाले आहे का हे पाहायला हवे,

पण हे त्यांना कसे सांगायचे? मी सांगते, “अगदी तुम्हाला लिहिता वाचण्याचा कंटाळा येत असेल असं समजू, तरी तुमच्यात ‘समज’ तर मोठ्या माणसाची आहे ना? रोज मुलाकडून एकेका विषयाचा एक धडा मोठ्याने वाचून घ्या. तुम्ही तुमचे काम करता करता ऐका, दोघे मिळून त्याचा अर्थ लावा. लहान मुलाला समजेल अशी पुस्तके सोपी करून लिहिली आहेत, ती तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला कळणार नाहीत का? मुलाचे वाचन चांगले होतेय ना ते पहा, तुमच्याही ज्ञानात सहज भर पडेल आणि मुलाचा अभ्यासही होईल.

भुकेल्या मुलाला जेवण देऊन तृप्त करण्यात जे समाधान आहे, तसेच समाधान एखाद्या मुलाला न समजलेली अभ्यासातील गोष्ट समजावून सांगितल्यावर होणारा आनंद पाहून मिळते. पालकांनी हे घरचे समाधान चुकवू नये. वास्तविक पालक सहभाग हाच मुलांचा अभ्यास घेण्याचा उत्तम प्रकार आहे. विद्यार्थ्यनि पाठ्यपुस्तक एकदा तरी लक्ष देऊन संपूर्ण वाचले पाहिजे. त्यासाठीच तर ते तयार केले आहे. अशा वाचनाने पालक आणि मुलं यांचे भावबंधदेखील दृढ होतील. कारण एखादी गोष्ट सातत्याने बरोबर केल्यामुळे परस्पर भावबंध (बॉण्डिंग) घट्टहोतात. मुलांना स्वयंअध्ययनाची सवय लागते; कारण ते स्वतः पुस्तक वाचून शिकण्याची क्रिया स्वत:लाच शिकवतात. स्वयंअध्ययन हा ‘गुरू’ त्यांना जन्मभर मदत करतो.

आता करोनामुळे अनेक शाळा बंद आहेत. ऑनलाइन शाळा हा एक नाइलाजाने स्वीकारावा लागणारा पर्याय आहे. ऑनलाइन शाळा सुरू करण्याचे प्रयत्न होत आहेत. कित्येक मुलांना ऑनलाइन क्लासवरच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. पण हे व्यावसायिक ऑनलाईन क्लासेस कसे चालतात व नेमके काय करून घेतात, त्यांना विद्यार्थ्यांबद्दल वैयक्तिक आत्मीयता किती आहे हे मात्र पालकांना स्वतः लक्ष घालून तपासून घ्यावे लागेल. पालकांना ‘वेळ नाही’ म्हणून परस्पर जबाबदारी झटकून चालणार नाही. शिक्षणाचे आऊटसोर्सिंग आत्तापर्यंत धकून गेले, इथून पुढे मात्र धकणार नाही.

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या प्रत्यक्ष भेटीएवढे परिणामकारक काहीच नाही. वर्गात प्रत्यक्ष शिक्षक शिकवत असतानादेखील मुलांचे लक्ष किती तरी वेळा इतरत्र जाते; ते लक्षात आले की शिक्षक चुचकारतात, रागावतात. हे ऑनलाइन शाळेत कसे शक्य होणार? ‘अटेन्शन स्पॅन’ किंवा ‘अवधान काळ’ हा सहसा मोठ्या माणसांचादेखील मोठा नसतो, लहान मुलांचा तर नक्की कमी असतो. म्हणून ऑनलाइन शिक्षणामध्ये शिक्षक हा विद्यार्थ्यांची एकाग्रता किती खिळवून ठेवतो याला फार महत्त्व आहे. एक उत्तम ऑनलाइन शिक्षक हा केवळ विषय शिक्षक असून चालत नाही तर तो चांगला काउन्सीलरही असावा लागतो. छोट्या स्क्रीनवर देखील मुलांना खिळवून ठेवण्याची त्याच्या अंगी क्षमता लागते.

ऑनलाईन शालेय शिक्षण चांगले होण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत : शिकण्यास उत्सुक विद्यार्थी, शिकवण्यास उत्सुक शिक्षक अाणि उत्तम अभ्यास योजना. शाळेची हवेशीर, मोकळी इमारत व प्रसन्न वातावरण या गोष्टींचा अभाव स्वीकारून हे शिक्षण द्यावे लागणार असले तरीही पाठय़पुस्तके ही मूळ संकल्पना मात्र बाजूला ठेवता येणारच नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाबरोबरच ‘ऑफलाइन पाठय़पुस्तक वाचन’ याचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ऑनलाइन असणाऱ्या शिक्षकाने व पालकांनीही अधोरेखित केलेच पाहिजे.

आजकाल सगळीच पुस्तके बालप्रिय (स्टुडंट फ्रेण्डली) आहेत असे दिसून येईल. त्यामुळे ऑफलाइन वेळात पालकांसमवेत मुले ती सहज वाचू शकतात. असे केल्याने स्क्रीनवर बघून बघून डोळ्यांवर व मानेवर येणारा ताणही कमी होईल. तसेच पाठीचा कणा ताठ ठेवणे, योग्य स्थितीमध्ये बसणे याही गोष्टी सांभाळता येतील. शिक्षकांच्या देखरेखीचा अभाव जमेल तसा पालकांनी भरून काढायला हवा, ते सहज शक्य आहे. रोज प्रत्येक मुलासाठी अर्धा ते एक तास काढायला हवा. एका विषयाचा एक धडा दोघांनी मिळून वाचावा. त्याचा सावकाश अर्थ लावावा. दुसऱ्या दिवशी थोडी उजळणी करावी.ज्याला कुणाला शक्य आहे त्याने आपला वेळ ‘आधार’ म्हणून मुलांना द्यावा ही मुलांची मनातून माफक अपेक्षा आहे.

असे करूनही मुलांची चिडचिड होत असेल, ती ऐकत नसतील, बिथरलेली असतील व ऑनलाइन शिक्षणात स्वारस्य घेत नसली तर मात्र शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ समुपदेशकाचा सल्ला घ्यायला हवा. शिक्षण समुपदेशनाद्वारे ऑनलाइन शिक्षणासाठीची त्यांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक तयारी करून घेतली जाते.

लेखिका
– प्रमिला पवार, समुपदेशिका, लाईफ कोच, ब्रेन सिक्रेट नाशिक.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.