महिंद्रा कंपनीच्या युनियनमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी, विद्यमानांना दाखविला घरचा रस्ता

0

नाशिक : संपूर्ण औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील कामगारांनी विद्यमान कमिटीला घरचा रस्ता दाखवत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. तीन वर्षांच्या ऐवजी सात वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या एकाही विद्यमान सदस्याला आपले पद टिकवता आले नाही.

नाशिक औद्योगिक वसाहतीतील मदर इंडस्ट्री अशी ओळख असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या अंतर्गत युनियन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी शनिवारी (दि. १३) मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत २१७१ कामगारांनी मतदानाचा हक्क बजावला. विद्यमान कमिटीने तीन वर्षाचा कालावधी असतानाही अनेक कारणांनी निवडणुका पुढे ढकलत सात वर्ष सत्ता उपभोगली होती. या कालावधीत त्यांनी कामगारांचे हित जोपासले नसल्याचा निर्वाळाच कामगारांनी दिला आहे. विद्यमान कमिटीने स्वहित बघून कामगार दुर्लक्षित केल्याचा आरोप नेहमीच होत होता.

कंपनीत निवडणूक घ्यावी, यासाठी आग्रही असलेल्या कामगारांनी राजकीय व प्रशासकीय यंत्रणेकडेही पाठपुरावा केला होता. मात्र त्यांना यश न आल्याने शेवटी त्यांनी काेर्टाचे दरवाजे ठोठावले होते. काेर्टाच्या आदेशाने शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात विद्यमान अध्यक्ष योगेश चव्हाण, उपाध्यक्ष राजा पवार, जनरल सेक्रेटरी सोपान शहाणे (निवृत्त), सेक्रेटरी परशुराम कानकेकर, जॉईन सेक्रेटरी लॉरेन्स भंडारे, खजिनदार ज्ञानेश्वर पाटील (निलंबित), कमिटी मेंबर (अ) सुनील अवसरकर, कमिटी मेंबर (ब) भुवनेश्वर पोई यांना कामगारांनी सपशेल नाकारले.

हे आहेत नवनियुक्त पदाधिकारी
अध्यक्ष- एन. डी. जाधव, उपाध्यक्ष संजय घुगे, जनरल सेक्रेटरी-संजय घोडके, जॉइंट सेक्रेटरी-अजित थेटे, खजिनदार-सचिन मोरे, सेक्रेटरी- जीतू सूर्यवंशी, कमिटी मेंबर-(अ) प्रकाश धनगर माळी, कमिटी मेंबर-(ब) संतोष सावकार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.