विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच, शरद पवार यांनी केले स्पष्ट

0

पुणे : काँग्रसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षाकडे हे पद जाणार यावरुन महाविकास आघाडीत बरेच खलबत्ते सुरू आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी आता सर्वांना खुले असल्याचे वक्तव्य करीत काँग्रेस, शिवसेनेची गोची केली होती. त्यानंतर काँग्रेस उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याच्या बातम्या समोर आल्या. मंत्री बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्री केले जाईल, तर नाना पटोले यांच्याकडे महसुलमंत्री पद येईल अशीही चर्चा रंगली होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद नेमके कोणाकडे जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. मात्र आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील असे स्पष्ट संकेत दिल्याने, आता ही चर्चा थांबेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्विकारण्यासाठी नाना पटोले यांनी गुरुवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये या पदावरुन एकच चर्चा रंगली होती. शिवाय दोन्ही घटकपक्ष नाराज असल्याचे बोलले जात होते. सरकार स्थिरस्थावर होत असताना नाना पटोलेंनी दिलेल्या राजीनाम्यामुळे विरोधकांनी सरकारच्या अस्थिरतेचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काहीसा नाराजीचा सूर असल्याचे दिसून येत होते.

मात्र पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवार यांना याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, ‘ ‘विधानसभा अध्यक्षपद ही काँग्रेसची जागा आहे. विधानसभा अध्यक्षपद, मुख्यमंत्री या जागा पक्षाच्या असल्या तरी सहकाऱ्यांशी विचारविनिमय करण्याची एक पद्धत आहे’ असे शरद पवार म्हणाले. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस त्या पदावर दावा सांगणार अशी सुद्धा चर्चा सुरु होती, मात्र आता या चर्चेला तुर्तास पूर्णविराम मिळाला असे म्हणता येईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.