लॉकडाऊन नाही, मात्र नियम बंधनकारक, नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

0
नंदुरबार :  जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ बाबत कोणतेही निर्देश देण्यात आले नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, मात्र कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या अर्थचक्रावर परिणाम होत असल्याने शासनाकडून निर्देश येईपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार नाही. तथापि नागरिकांनी मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे. व्यावसायिकांनी स्वत: नियमांचे पालन करण्यासोबत ग्राहकांनादेखील याबाबत सूचना द्याव्यात. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे.
जिल्ह्यात विवाह सोहळे, सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमात शासनाने दिलेल्या मर्यादेच्या आतच उपस्थिती राहील याची दक्षता घ्यावी. विशेषत: कोरोनाचा प्रसार अधिक असलेल्या जिल्ह्यातून विवाहासाठी पाहुणे मंडळी येत असल्यास खबरदारी घ्यावी. सोहळ्याचा आनंद घेताना मास्कचा वापर होईल याकडे आयोजकांनी लक्ष द्यावे. नियमांचे पालन न केल्यास आयोजक आणि लॉन्स किंवा मंगल कार्यालयाच्या मालकाविरोधात कारवाई करण्यात येईल.
प्रशासनाने गृह विलगीकरण बंद केल्यानंतर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे. तरीदेखील राज्यातील इतर काही जिल्ह्यात ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने दक्षता घेण्याची आश्यकता आहे. नागरिकांनी सतत हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, शारिरीक अंतर राखणे आणि मास्कचा वापराविषयी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. प्रशासनास सहकार्य केल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.