रात्रीच्या पार्ट्यांनी कोरोना होत नाही, फक्त MPSC परीक्षेनेच होतो काय?, नितेश राणेंचा खोचक सवाल!

सत्ताधारी आमदार रोहित पवार, सचिन सावंत यांनीही परीक्षा ठरल्या तारखेलाच घेतल्या जाव्यात अशी मागणी केली

0

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या निर्णयावर पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यात रस्त्यावर उतरत आहेत. तर राजकारण्यांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मते व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘फक्त एमपीएससी परीक्षेमुळेच कोरोना होणार, रात्रीच्या पार्टीमध्ये नाही?’ नितेश राणे यांनी सरकारवर उपस्थित केलेल्या खोचक प्रश्नानंतर अन्य राजकारण्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पुढेही नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना लिहिले की, MPSC च्या परीक्षा परत पुढे ढकलल्या.. परीक्षेला बसणाऱ्या मुलांचे वय वाढत चालले आहे. मुलांचे वय कसे कमी करणार? यांची मुलं परीक्षेला बसली नाही, म्हणून वाट्टेल ते निर्णय घेत आहेत! फक्त MPSC परीक्षेमध्येच करोना होणार..रात्रीच्या पार्टीमध्ये नाही?

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मनसेनं रात्रीच्या वेळी फेसबुक लाईव्ह करून बारमधील पार्ट्यांची आणि गर्दीची दृश्य दाखवली होती. कोरोनाचे निर्बंध असताना बेकायदेशीरपणे आदित्य ठाकरे यांच्याच मतदार संघात अशाप्रकारची पार्टी रंगल्याने, मनसेने सरकारला फैलावर घेतले होते. आता त्याचाच संदर्भ देवून नितेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या प्रश्नावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह सत्ताधारी आमदार राेहित पवार, सचिन सावंत यांनीही ट्विट करून परीक्षा ठरलेल्या तारखेवरच घेतली जावी अशी मागणी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.