गॅसची दरवाढ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाढीप्रमाणे वाढत आहे : रुपाली चाकणकर

वाशिम येथे रस्त्यावर चुल पेटवित केल्या चुलीवर भाकऱ्या

0

वाशिम : दिवसागणिक महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. त्यातच घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कमालीची वाढ केल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने राज्यभर शेणाच्या गोवऱ्यांनी चूल पेटवून तीव्र आंदोलन केले जात आहे. महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या आंदोलनाच्या नेतृत्व करीत असून, राज्यभरात विविध ठिकाणी सरकारचा निषेध केला जात आहे. वाशिम येथेही आंदोलन करण्यात आले असून, यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चक्क रस्त्यावर उतरून चुलीवर भाकऱ्या भाजत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सररकारचा निषेध केला आहे. तसेच गॅस दरवाढीची मोदी यांच्या दाढीशी सुरू असलेली स्पर्धा थांबवा असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

गॅसच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दाढी वाढत आहे, तशीच गॅसची दरवाढ होत आहे. जणू काही यांच्यात स्पर्धा लागली आहे. मात्र यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत असून, त्यांनी दरवाढीची ही स्पर्धा थांबवायला हवी, असा हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकार महिलांच्या प्रश्नांबाबत अजिबात संवेदनशील नाही. ही योजना ५ कोटी महिलांपर्यंत पोहोचविण्याची योजना होती. ती पोहोचली की नाही माहीत नाही, पण महिलांना मात्र या दरवाढीने मोदी सरकारने रडवले आहे. त्यांच्या या दरवाढीमुळे महिला वर्गाचे बजेट कोलमडले आहे. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने महिलांसाठी कुठल्याही योजना आणल्या नाही. त्यामुळे हे सरकार महिलांच्या विरोधातील आहे. शिवाय ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे, तिथे महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात सरकारला आणि आरोपींना पाठीशी घालण्याचे धोरण सरकारने राबवले आहे, असा आरोप चाकणकर यांनी केला.

महिलांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यातील स्वयंसेवी संस्थांचेही अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांच्या बाबतीत सरकार संवेदनशील नसून महिलांच्या विरोधात आहे असं स्पष्ट होतं. यापूर्वी आम्ही चूल पेटवा आंदोलन केले, त्याची दखल घेण्यात आली नाही. याउलट आमच्या माताभगिनींच्या कराच्या पैशातून पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज लावून जाहिरात करणं सुरू आहे. त्यामुळेच या होडिंग्जच्या विरोधात यापुढील काळात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चाकणकर यांनी दिला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.