MPSC Exam : मी वचन देतो, आठवडाभरातच परीक्षा होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्या जाहीर केल्या जाणाऱ्या नवा तारखेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे

0

मुंबई : अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच संताप व्यक्त केला गेला. पुण्यातील रस्त्यांवर उतरून विद्यार्थ्यांनी आपला रोष व्यक्त केला. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात बघावयास मिळाले. तसेच राजकारण्यांनीही विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलताना सरकारने परीक्षा ठरलेल्या दिवशीच घ्यावी अशी मागणी केली. विरोधकांनी तर सरकारच्या कार्यपद्धतीवरच संशय व्यक्त करीत सरकारला खडबेल सुनावले यादरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना काय बोलतील याकडे लक्ष होते.

विद्यार्थ्यांनी राज्यभरात आंदोलने सुरू केल्याने मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी विद्यार्थी तसेच महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परीक्षेच्या नव्या तारखेविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, मी माझ्या विद्यार्थी, विद्यार्थीनींना मनापासून सांगतो, विनंती करतो की, उगाच कोणी भडकवतो म्हणून भडकून जाऊ नका. आपण जो अभ्यास करत आहात तो अभ्यास करत रहा. मी तुम्हाला वचन देतो की येत्या आठवड्याभरात ही परीक्षा होईल. गेल्यावर्षी दिवाळीपूर्वी एमपीएससी परीक्षेची तारीख जाहीर झाली होती आणि नंतर ही तारीख पुढे ढकलली होती. ही परीक्षा पुढे ढकलत असताना मी सांगितलं होतं की, नवी तारीख कोणत्याही परीस्थितीत पुढे ढकलली जाणार नाही आणि त्यानंतर १४ मार्च ही तारीख जाहीर करण्यात आली होती. पण आता तारीख पुढे ढकलण्यात आली आहे ती एक महिना दोन महिना पुढे ढकलण्यात आढळलेली नाहीये. तर केवळ काही दिवसांसाठी करत आहोत. मी आज स्वत: मुख्य सचिवांना आणि एमपीएससीच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या की, या तारखांबाबतचा घोळ संपवा आणि उद्या ही तारीख झालीच पाहीजे. तसेच ही तारीख येत्या आठ दिवसांतलीच असली पाहिजे, असे सांगितल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘परीक्षा पुढे ढकलली याचं कारण कोविडचंच आहे. आपल्याला कल्पना असेल या परीक्षेचा संपूर्ण यंत्रणा लावावी लागते ती शासकीय यंत्रणाच आहे. विद्यार्थी आल्यानंतर त्यांचे सीट नंबर पाहून बसण्याची व्यवस्था करणे, प्रश्नपत्रिका संच देणे, सूपरवायझर या सर्व गोष्टींसाठी कर्मचारी वर्ग आवश्यक असतो. या कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट करणं आवश्यक आहे. ही टेस्ट झाली आहे का? माझं तर मत आहे की, ज्यांना कोविड प्रतिबंधक लस दिली आहे त्या कर्मचाऱ्यांनाच या परीक्षेसाठी दिले जावेत अशा माझ्या सूचना आहेत. म्हणजेच विद्यार्थी परीक्षेला आल्यावर त्याच्यावर दडपण असून नये की, आपल्याला जो व्यक्ती पेपर वाटत आहे तो तर कोरोना बाधित नाहीये ना? तो व्यक्ती कोरोना बाधित असल्याची शंका मनात येऊ नये.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतरही विद्यार्थ्यांमध्ये रोष कायम आहे. ठरलेल्या तारखेवरच परीक्षा घेतली जावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. त्याचबरोबर सत्ताधारी तथा विरोधी पक्षाकडूनही हीच मागणी होत असल्याने, सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. अशात उद्या नेमकी कोणती तारिख जाहीर केली जाईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.