स्थानिक कारागीरही येणार ई-कॉमर्सच्या विश्वात, त्यासाठी केला ‘हा’ सामंजस्य करार!

एमएसएसआयडीसी आणि एमएसकेव्हीआयबीमध्ये सामंजस्य करार

0

नाशिक :  खादी, पैठणी साड्या, लाकडाची खेळणी, हाताने बनवलेल्या वस्तू, दागिने, कागदी वस्तू, पर्स आणि हस्तकलेच्या इतर वैशिष्ट्यपूर्ण वस्तू लाखो ग्राहकांसमोर मांडता याव्यात आणि सरकारच्या ‘वोकल फॉर लोकल’ या उद्देशालाही बळकटी मिळावी याकरिता महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित (एमएसएसआयडीसी) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ (एमएसकेव्हीआयबी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक कारागीर आता ई-कॉमर्सच्या विश्वात येणार आहेत.

‘फ्लिपकार्ट समर्थ’ असे या उपक्रमाचे नाव असून, त्यामध्ये स्थानिक कारागीर आणि त्यांच्या उपक्रमांचा समावेश करण्यात येणार आहे. या करारावर उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्य उद्योगमंत्री आदिती तटकरे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारअंतर्गत राज्यातील स्थानिक कारागीर, विणकर, हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू देशातील लाखो ग्राहकांसमोर मांडता येणार आहेत. कुशल स्थानिक कारागीर समुदायाला फ्लिपकार्ट मार्केटप्लेसवर परिणामकारक, पारदर्शक आणि योग्य मूल्यासहित व्यवसायास बळकटी आणण्यासाठी या उपक्रमातून साह्य केले जाईल.

सुरुवात करण्यासाठी योग्य वेळेतील पाठबळ देत हा उपक्रम स्थानिक कारागिरांपुढील सुरुवातीच्या टप्प्यातील अडथळे दूर करतो. यात सहजपणे ऑनबोर्डिंग, मोफत कॅटलॉग तयार करणे, विपणन, अकाउंट व्यवस्थापन, व्यवसायासंबंधी माहिती आणि गोदामाची सुविधा अशा लाभांचा समावेश आहे. यामुळे समाजातील या अत्यंत महत्त्वाच्या समुदायासाठी व्यवसायवृद्धी आणि उद्योग समावेशकतेच्या संधी या उपक्रमातून निर्माण होणार आहेत.

हस्तकला उद्योगाला पुनरुज्जीवन
राज्य सरकारने एमएसएसआयडीसी आणि एमएसकेव्हीआयबीची स्थापना करून राज्यातील लघुउद्योगांना विकासासाठी नवे बळ आणि दृष्टिकोन दिलेला आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक ग्रामोद्योग, उत्पादने आणि हस्तकलेच्या वस्तूंचा उद्योग पुनरुज्जीवित करणे, त्यांचा विकास आणि प्रगती यासाठी ग्रामीण भागातील कारागिरांच्या विविध गरजांकडे लक्ष दिले जात आहे, तसेच त्यांची उत्पादने भारतात आणि परदेशात वितरित केली जात आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.