इतर मागासवर्गियांसाठी स्वयंरोजगाराकरिता कर्ज; गरजू व इच्छुकांनी अर्ज सादर करावे

नाशिक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.जी. तायडे यांनी केले आवाहन

0

नाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगाराकरीता बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व गटकर्ज व्याजपरतावा या योजनांतर्गत कर्ज सुविध उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू व इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावे असे, आवाहन नाशिक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.जी. तायडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व गटकर्ज व्याजपरतावा या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी इतर मागासवर्ग प्रवर्गातील व नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असावा. लाभार्थी व्यक्तीचे वय 18 ते 50 या दरम्यान असावे. तसेच तो कोणत्याही बँकचा थकबाकीदार नसावा व बँकेचा सिबिल स्कोर 500 पेक्षा जास्त असावा. याबरोबरच कुटूंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येणार असून, अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान किंवा अनुभव असणे आवश्यक आहे. वरील योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळाच्या नियमाप्रमाणे असणार आहे. याची अर्जदारांनी नोंद घ्यावी, असेही शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

योजनांचा सविस्तर तपशिल

बीज भांडवल योजनेच्या लाभासाठी प्रकल्प मर्यादा 5 लाख रूपये, महामंडळाचा सहभाग 20 टक्के, बँकेचा सहभाग 75 टक्के, महामंडळाच्या कर्जावर 6 टक्के, बँकेचे साधरण व्याजदर 11 ते 13 टक्के, परतफेडीचा कालावधी 5 वर्षे असणार आहे. थेट कर्ज योजनेच्या लाभासाठी प्रकल्प मर्यादा 1 लाख रूपये पर्यंत, या योजनेंतर्गत नियमितपणे दरमहा ठरविलेला हप्ता भरल्यास व्याजदर शुन्य टक्के, परतफेडीचा कालावधी 4 वर्ष असणार आहे. तसेच वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेच्या लाभासाठी प्रकल्प मर्यादा 10 लाख रूपये व गट कर्ज व्याजपरतावा योजनेच्या लाभासाठी प्रकल्प मर्यादा 50 लाख रूपये पर्यंत असणार आहे. सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर नावं नोंदणी करणे अनिवार्य असून, नोंदणी केल्यानंतर कर्ज मागणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

वरील योजनांबाबत अधिक माहितीसाठी नाशिक महाराष्ट्र राज्य इतर मागसवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जिल्हा कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0253-2236073यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही जिल्हा व्यवस्थापक एस.जी. तायडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.