खासदार नवनीत राणा यांच्यावर ॲसिड फेकण्याची धमकी, शिवसेनेच्या कथित लेटरहेडमध्ये अर्वाच्य भाषेचा वापर!

0

नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा यांना एका अज्ञाताने ॲसिड फेकण्याची धमकी दिल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. धमकीचे हे पत्र शिवसनेच्या कथित लेडरहेडवरून दिल्याने, प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.  दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत शिवसेनेवर आरोपाची राळ उडवून देताना दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नवनीत राणा यांना ही धमकी ज्या शिवसेनेच्या लेटरहेडवरून देण्यात आली आहे, त्यावर कोणत्याही शिवसेना नेत्याचे नाव नाही. त्यामुळे या लेटरहेडला आधार काय? असा सवालही उपस्थित केला जात आहे. मात्र नवनीत राणा यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना हे धमकीचे पत्र शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या इशाऱ्यावरून पाठविण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच त्याबाबतचा उल्लेखही तक्रारीत केला आहे. 

दरम्यान, नवनीत राणा यांना प्राप्त झालेल्या कथित शिवसेनेच्या लेटरहेडवर लिहिले की, ‘तुला आम्ही आठ दिवसाचा वेळ देत आहोत, आतापर्यंत तू जे आमच्या साहेबांबद्दल सोशल मिडियाच्या माध्यमातून विरोधात बोलली आहे. त्याबद्दल साहेबांची आणि शिवसेनेची जाहीर माफी माग, ‘नाहीतर जिथे मिळेल तिथे तुजा कांड करू’, असे या कथित पत्रात म्हटले आहे. अमरावती जिल्ह्याच्या खासदार असलेल्या नवनीत राणा यांनी मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. तसेच शिवसेनेवर त्या वेळोवेळी निशाणा साधत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या, वाढीव वीजबिल अशा अनेक प्रश्नांवर त्या सरकारला लक्ष करीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हे धमकीचे पत्र आले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याबाबतची तक्रार नोंदविल्यानंतर दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत असल्याची माहिती समोर येत आहे.

नवनीत राणा यांना आलेल्या या धमकीच्या पत्रात अव्वार्च्य भाषेचा वापर केला आहे. तसेच ॲसिड फेकण्याची धमकी दिल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा उलगडा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना नेत्यांनी या पत्राबाबत फारश प्रतिक्रिया देणे टाळल्याने, या लेटरबॉम्ब मागे कोणाचा हात असू शकतो, याबद्दल आता तर्क वितर्क लावले जात आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.