अजित पवारांचा मुख्यमंत्री होण्याचा डाव शरद पवारांनीच उधळला

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची अजित पवारांवर जोरदार टीका

0

ठाणे : लोकराष्ट्र वृत्तसेवा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक नेते तसेच सेलिब्रिटींच्या घरी गणपती दर्शनसाठी जाण्यावरून टीका केली होती. त्यावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी “अजित पवारांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे मुख्यमंत्री होता आले नाही.” असे म्हटले आहे. ते ठाण्यात माध्यमांशी बोलत होते.

“अजित पवार हे महाराष्ट्रातील फार मोठे नेतृत्व आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या आयुष्यात एकदा मुख्यमंत्री होण्याची चालून आलेली संधी मोठ्या पवारसाहेबांनी काँग्रेसला दिली. त्यानंतर त्यांनी एकदा पहाटे शपथविधी करून उपमुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पवारसाहेबांनी त्यांचा तो डाव उलटवून लावल्यामुळे त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता आले नाही. याची खंत अजूनही त्यांच्या मनात आहे, असे वाटते.” असे ते म्हणाले.

अजित पवार यांनी, “भाईंना पूर्वींच्या शोमॅनसारखे शो करायची सवय आहे. राज कपूर पूर्वी शोमॅन म्हणून ओळखले जायचे. तशाप्रकारची सवय त्यांना लागली आहे,” असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारला होता. त्यावर शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले आहेत. “कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला हे अजित पवारांना सहन होत नाही. शिंदे हे मागील अनेक वर्षांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी गणपती दर्शनाला जातात. अजित पवारांनी श्रद्धेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.” असा आरोप त्यांनी केला. “शिंदेसाहेबांचे हात अजूनही आभाळाला टेकलेले नाहीत. त्यांचे पाय जमिनीवर आहेत. हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते.” असेही म्हस्के म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांविरोधात बोललो नाही तर विरोधीपक्ष नेतेपद मोठे पवारसाहेब काढून घेतील ही भीती अजित पवारांच्या मनात असावी. म्हणून ते मुख्यमंत्र्यांवर टीका करत असतात. मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी दादा आणि ताईंची जी चढाओढ सुरू आहे. ती पाहून ‘दया कुछ तो गडबड हैं’ हा संवाद मला आठवतो.” असा टोलासुद्धा त्यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना मारला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.