टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ दोन महत्त्वाच्या खेळाडूंचे पुनरागमन!

जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल या दोघांचे संघात पुनरागमन झाले आहे

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा

आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला असून, संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही बाब नक्कीच सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर दिनेश कार्तिक व ऋषभ पंत या दोन्ही यष्टीरक्षकांना स्थान देण्यात आल्याने, संघातील स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून बुमराह आणि हर्षल पटेल दुखपतीमुळे संघाबाहेर होते. आशिया चषक स्पर्धेत त्यांना सहभागी होता आले नाही. दरम्यान, टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळाल्याने, भारताची गोलंदाजीची बाजू भक्कम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सोमवारी दुपारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीची संघनिवडीसाठी बैठक झाली. आशिया चषक स्पर्धेतील आपल्या अपयशात गोलंदाजी हा कमकुवत दुवा असल्याचे समोर आले होते. त्यामुळे बुमरा व हर्षलच्या निवडीमुळे गोलंदाजी मजबूतीकडे लक्ष देण्यात आले आहे. त्यांच्या जोडीला भुवनेश्वर कुमार व अर्शदीप सिंग आहेत. मोहम्मद शमीलाही संघात स्थान दिले जाईल असा अंदाज होता पण त्याला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याच्यासोबत दीपक चहर आणि रवी बिश्नोई हे राखीव खेळाडू आहेत.

गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे बाहेर बसावे लागलेल्या अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलला स्थान देण्यात आले आहे. हार्दिक पांड्या व दीपक हुडा हे संघातील इतर अष्टपैलू आहेत. फलंदाजी फळीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे संजू सॅमसन व इशान किशनसारखे गडी संघाबाहेरच आहेत. यष्टीरक्षकांमध्ये ऋषभ पंत ह्याला यष्टीरक्षक म्हणून तर दिनेश कार्तिकला फिनीशर म्हणून संघात खेळवले जाईल असा अंदाज आहे.

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर.अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग

राखीव खेळाडू : मोहम्मद शामी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.