India vs England 4th Test : भारताकडून इंग्लंडचा दारुण पराभव, मालिका जिंकली!

0

अहमदाबाद : भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या कसोटीचा अपवाद वगळता, इतर तिन्ही कसोटी सामान्यात लौकीकाला साजेशी अशी खेळी केली नाही. तिन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजांची फळी पत्यासारखी कोसळल्याने, भारताच्या विजयाचा मार्ग सुकर होत गेला. विशेषत: भारताच्या फिरकी गोलंदाजांच्या जाळ्यात इंग्लंडचे फलंदाज असे काही अडकले की, त्यांना पुन्हा त्यातून बाहेर पडणे अवघड होत गेले. मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात तर इंग्लंडच्या फलंदाजांना अखेरपर्यंत सावरता आले नाही. परिणामी भारताने एक डाव राखत २५ धावांनी इंग्लंडचा दारुण पराभव केला.

भारताने पहिल्या डाव्यात १६० धावांची आघाडी घेतल्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाचे फलंदाज रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. या दोन्ही प्रमुख गोलंदाजांनी इंग्लंडचे प्रत्येकी पाच खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवित भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. तसेच भारताने चार सामन्यांची ही कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये आपले स्थान निश्चित केले.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर वॉशिंग्टन आणि अक्षर पटेल यांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंजांसमोर विकेट मिळवण्यासाठी आव्हान निर्माण केलं होतं. दोघांनी मिळून एकूण १०० धावांची भागीदारी केला. मात्र ४३ धावांवर असताना अक्षर पटेल रन आऊट झाला आणि अर्धशतकाची संधी हुकली. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरकडे मात्र शतकाची संधी होती. पण इशांत आणि सिराज यांनी आपली विकेट गमावल्यामुळे शतकाची संधी पुन्हा एकदा हुकली. वॉशिंग्टन ९६ धावांवर नाबाद राहिला. ३६५ धावांवर ऑल आऊट झालेल्या भारतीय संघाने १६० धावांची आघाडी घेतली होती.

ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशी केलेली जबरदस्त खेळी आणि वॉशिंग्टनच्या फलंदाजीमुळे भारताने १६० धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताकडे ८९ धावांची आघाडी होती. दरम्यान इंग्लंड संघ चहापानानंतर मैदानात उतरताच अश्विनने क्रॉलीची विकेट घेत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर आलेला ब्रेनस्टॉ खातंही उघडू शकला नाही. अश्विनने रोहित शर्माच्या हाती त्याला झेलबाद केलं. यानंतर अक्षरने सिब्ले आणि बेन स्टोक्सची विकेट घेत इंग्लंडसमोर पराभवाचं संकट निर्माण केलं आहे. इंग्लंडची धावसंख्या २० ओव्हर्सनंतर ४० धावांवर ४ बाद अशी झाली होती.

यानंतर अश्विन आणि अक्षरने जो रुट आणि पोपची विकेट घेत इंग्लंडवर पराभवाचं संकट निर्माण केलं. डॅन लॉरेन्स वगळता इंग्लंडचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभी करु शकला नाही. लॉरेन्सने अर्धशतक आणि जो रुटने केलेल्या ३० धावा या सर्वाधिक धावसंख्या ठरल्या. सहा फलंदाज एक अंकी धावसंख्येवरच तंबूत परतले. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या इंग्लंड संघाला पहिल्या डावात २०५ धावांवर ऑल आऊट केलं होतं. दुसऱ्या डावात मात्र इंग्लंडचा संघ १३५ धावांमध्येच गारद झाला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.