INDIA v/s ENGLAND : पहिल्याच सामन्यात भारताचा दारूण पराभव

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले, श्रेयस अय्यरची दमदार खेळी

0

अहमदाबाद : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात ३-१ अशा फरकाने विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाला पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडविरुद्ध दारूण पराभव पत्कारावा लागला. सुरुवातीला फलंदाजीला मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने फलंदाजीत अत्यंत निराशाजनक कामगिरी केल्याने, इंग्लंडसमोर केवळ १२५ धावांचे माफक लक्ष ठेवले गेले. परिणामी या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने दोन गडी गमावून सहज विजय संपादन केला. यामध्ये इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयनं ३२ चेंडूत ४९ धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीमध्ये रॉयनं ३ सणसणीत षटकार आणि ४ चौकार लगावले.

जेसन रॉय (४९) आणि जॉस बटलर (२८) या दोघांनी इंग्लंडला ७२ धावांची दणदणीत सलामी दिली आणि टीम इंडियाच्या हातून सामना निसटल्याचं स्पष्ट झालं. आपला १००वा सामना खेळणाऱ्या युजवेंद्र चहलनं आठव्या षटकामध्ये जॉस बटलरला पायचीत करून टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यापाठोपाठ १२व्या षटकामध्ये वॉशिंग्टन सुंदरने आपल्या पहिल्याच षटकाच्या चेंडूवर जेसन रॉयला पायचीत करून माघारी धाडलं. मात्र, तोपर्यंत या दोघांनी सामना इंग्लंडच्या खिशात आणून ठेवला होता. सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर आलेल्या डेविड मलान(२४) आणि जॉनी बेयरस्टो(२६) यांनी हातात आलेल्या इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासोबत इंग्लंडने मालिकेत १-० आघाडी घेतली.

दरम्यान, टॉस हारलेल्या टीम इंडियाला सुरुवातीला फलंदाजी करावी लागली. सुरुवातीपासूनच भारताची पडझड झाली. संघांच्या अवघ्या दोन धावा असतानाच के. एल. राहुल जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली याला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यास अपयश आले. अवघ्या तीन धावांमध्ये दोन गडी बाद झाल्यानंतर लगेचच शिखर धवन चार धावा काढून स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर रिषंभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव काही प्रमाणात सावरला. पंतने २१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर श्रेयसने ६७ धावा करीत भारताला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचविले.

पंत बाद झाल्यानंतर त्याने हार्दिक पंड्याच्या मदतीने भारताचा डाव सावरला. पंड्याने १९ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरसोबत त्याने ५४ धावांची भागीदारी करत भारताला १००चा आकडा गाठून दिला. हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर शार्दूल ठाकूर (०) पहिल्याच चेंडूवर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदर (३) आणि अक्षर पटेल (७) यांनी भारताला १२४ धावांपर्यंत मजल मारून दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.