INDIA v/s ENGLAND : भारताकडून पराभवाची परतफेड, इंग्लंडवर सात गड्यांनी दणदणीत विजय!

0

अहमदाबाद : पहिल्या टी – २० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात पराभवाची सहव्याज परतफेड केली आहे. इंग्लंडवर तब्बल सात विकेटसनी दणदणीत विजय मिळवित भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७३ धावांची खेळी केल्याने भारताचा विजय सहज साकारणे शक्य जाले आहे. इंग्लंडने दिलेल्या १६५ धावांचे लक्ष भारताने सहज साध्य करीत गेल्या सामन्यांतील पराभावाचा वचपाच काढला आहे.

इंग्लंडने भारतासमोर १६५ धावांचे आव्हान दिले होते. त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनकच झाली. आघाडीचा आणि भरवशाचा समजला जाणारा फलंदाज के. एल. राहुल शुन्यावर बाद झाल्याने, सर्वांचीच चिंता वाढली होती. संघाला मोठा झटका बसल्यानंतर, भारतीय संघाने सावधच सुरुवात केली. परिणामी पहिल्या षटकात भारताला एकही धाव काढता आली नाही. सॅम करन याने के एल राहुलला बाद केलं. जोस बटलरने त्याचा यष्टीमागे झेल टिपला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि इशान किशन यांनी डावाला सावरला.

सहा षटकांत त्यांनी ५० धावांची भागीदारी केली. इशान किशनने स्फोटक फलंदाजी करत २८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर भारतीय संघाची १० षटकात ९४ धावासंख्या असताना इशान किशन ३१ चेंडूत ५६ धावा काढून बाद झाला. आदिल रशीदने त्याला एलबीडब्ल्यू बाद केलं. यानंतर धावसंख्या १३० असताना १३ व्या षटकात रिषभ पंत १३ चेंडूत २६ धावा काढून झेल बाद झाला. ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या षटकात जॉनी बेअरस्टोने त्याचा झेल टिपला व भारताचा तिसरा गडी बाद झाला. यानंतर विराट कोहलीने कर्णधाराला साजेशी नाबाद ४९ चेंडूत ७३ धावांची खेळी करत भारताला विजयी केलं. श्रेयस अय्यर व विराट कोहली नाबाद राहिले. भारताने १७ षटकं व पाच चेंडूत १६६ धावा केल्या.

दरम्यान, सध्या मालिकेत १-१ च्या बरोबरीने दोन्ही संघ खेळत आहेत. त्यामुळे पुढचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भारतीय संघाचा फार्म लक्षात घेता, मालिका जिंकण्याचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे बघितले जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.