मोदींच्या राज्यात केंद्रीय यंत्रणा सूडबुद्धीने राजकारण करत नाही; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईवर फडणवीस यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील ११ सदनिका जप्त केल्याची कारवाई ईडीने केली आहे. या कारवाईनंतर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया येत असताना भाजप नेत्यांकडून कारवाई योग्य असल्याचे म्हटले जात आहे. या कारवाईला २४ तास उलटल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मोदी हे कधीच सुडाचे राजकारण करत नाहीत, असे फडणवीस म्हणाले. ते नागपुरात माध्यमांसोबत बोलत होते.

फडणवीस म्हणाले, मोदींच्या राज्यात तरी कोणतीही केंद्रीय यंत्रणा सूडबुद्धीने राजकारण करत नाही. पण महाराष्ट्र सरकारकडून दरेकरांवर कशी कारवाई सुरू आहे, नसलेल्या गोष्टी कशा तयार केल्या जात आहेत, विरोधी नेत्यांविरोधात त्यांचे वकील मंत्र्यांसोबत बसून कसे कटकारस्थान करत आहेत या गोष्टीही बघावे. त्या या नेत्यांनी पाहाव्यात. मला असे वाटते, केंद्र सरकार असेल अथवा राज्य सरकार असेल, कुणीही कोणावरही चुकीची कारवाई करू नये. कारवाई योग्यच झाली पाहिजे. पुन्हा एकदा विश्वासाने सांगतो, मोदींच्या राज्यात चुकीची कारवाई होऊच शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर काल ईडीने कारवाई केली. ईडीने पुष्पक बुलियनमधील पुष्पक ग्रुप कंपनीची ६.४५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. नीलांबरी प्रकल्पातील ११ निवासी फ्लॅट जप्त केले आहेत. श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हे फ्लॅट्स आहेत. श्रीधर माधव पाटणकर हे या कंपनीचे मालक आहेत. पीएमएलए कायदा २००२ अंतर्गत ६ मार्च २०१७ पासून पुष्पक बुलियन आणि ग्रुप कंपनीजवर मनी लॉन्ड्रिंगची केस सुरू आहे. यापूर्वीही ईडीने पुष्पक बुलिनय कंपनीतील महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांच्या कुटुंबातील २१.४६ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.