मी देखील कोकणातला, असल्या धमक्यांना घाबरणार नाही; मंत्री उदय सामंतांचे प्रत्युत्तर

जोशी नामक नेत्याने नाना पटोले व पोलिसांच्या उपस्थितीत उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिली होती

0

मुंबई : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. स्थानिकांनी या रिफायनरीला विरोध केला असून, आता थेट एकमेकांना धमक्या देण्यापर्यंत हे प्रकरण गेले आहे. रविवारीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजापूर दौरा केला होता. दौऱ्यात जोशी नामक नेत्याने नाना पटोले व पोलिसांच्या उपस्थितीत उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिली होती. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, आता उदय सामंत यांनी असल्या धमक्यांना घाबरणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.

कोकणातील रिफायनरीच्या बाजूचे आणि विरोधातील अशा दोन्ही बाजूंशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. संवादाने काही प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. दादागिरीला मी तर घाबरणारा नाही. मी देखील कोकणातला असून राजापूरला लागूनच माझा मतदारसंघ आहे. त्यामुळे अशा धमक्यांना मी काही घाबरत नाही, असे प्रत्युत्तर सामंत यांनी धमकी देणाऱ्याला दिले.

सामंत म्हणाले, रिफायनरीला विरोध दर्शविणाऱ्यांनी ‘उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकू,’ अशी भाषा वापरली आहे. त्यासंदर्भात माझी कोकणचे आयजी, एसीपींशी चर्चा झाली आहे. विरोध करणे हा लोकशाहीतील एक भाग आहे. पण, मंत्र्यांनी पाऊल टाकले तर तंगड्या तोडू, त्यांना जाळून टाकू, ठार मारू, ही भाषा वापरणे दुर्दैवी आहे. संबंधित व्यक्तीचा यामागचा हेतू काय आहे. आता पोलिसांकडूनअशी माहिती मिळाली की एनजीओंनी त्या व्यक्तीला बोलायला लावले. पोलिस त्याचा तपास करतील आणि योग्य ती कारवाई करतील.

त्या एनजीओची मला माहिती नाही. धमकी देणारा व्यक्ती मुंबईचा असून त्याचा ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय आहे. कोकणातील नागरिकांना भडकावणे. दादागिरी करून त्यांच्यावर दबाव निर्माण करणे, अशी त्याची ओळख आहे. त्याच्यावर काही गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे त्याबाबतची माहिती पोलिस सविस्तरपणे घेतील आणि योग्य ती कारवाई करतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर अशी धमकी दिली जात होती तर त्याला थांबवायला हवे होते. कारण, ते सुद्धा रिफायनरी समर्थकांशी चर्चा करण्यासाठीच आले होते. भावनेच्या भरात एखादी व्यक्ती बोलत असेल तर ते योग्य की अयोग्य, हे शेजारी बसलेल्या नेत्यांना कळायला पाहिजे. सर्वांत महत्वाची बाब म्हणजे, ती व्यक्ती कोणाला जाळून टाकणार बोलला ही नंतरची बाब आहे. एखादी गुंड प्रवृत्तीची व्यक्ती मंत्र्याला जाळून टाकू, मंत्र्याच्या तंगड्या तोडू, अशी धमकी देत असेल आणि पोलिस काहीही कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत असेल तर ही दखल घेण्यासारखी बाब आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे, अशी माहितीही सामंत यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.