येथे घडतात इंजिनिअर, सायंटिस्ट अन्‌ स्कील वर्कर्स : युवा उद्योजक आबासाहेब थोरात यांचे मिशन

इलाईट सर्टिफिकेशन अ‍ॅण्ड इनोव्हेटिव्ह सोल्युशन : ‘अटल टिंकरिंग लॅब’ एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प

0

नाशिक : लोकराष्ट्र वृत्तसेवा

ब्रिटीशांमुळे आपल्या देशाला नव्या वैज्ञानिक-तंत्रज्ञानीय क्रांतीची चाहूल लागली. त्यांनी भारतात रेल्वे, तार, पोस्ट अशा नव्या सुविधा आणल्या, हे खरे; पण त्यामागे त्यांचा उद्देश या महाकाय संपन्न वसाहतीचे अधिक चांगल्या पद्धतीने शोषण करता यावे, हा होता. भारतीय विज्ञान-तंत्रज्ञान परंपरेची आधीच क्षीण झालेली परंपरा ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे खिळखिळी केली. येथील अठरापगड जातींनी जपून ठेवलेली कौशल्ये लयाला गेली आणि मौखिक परंपरेने चालत आलेले ज्ञानही उतरणीला लागले. 150 वर्षे राज्य केल्यावर ब्रिटिशांनी हा देश सोडला, तेव्हा येथे कारखानदारी सोडाच, विज्ञान-तंत्रज्ञानाचा इमला उभारण्यासाठी पायाभरणीही केलेली नव्हती. पण, स्वातंत्र्यप्राप्तीच्या दोन-तीन दशकांनंतर विज्ञान-तंत्रज्ञानाला आपलेसे करून भारतीयांनी आपली अफाट बुद्धिमत्ता सिद्ध केली. सुदैवाने आज संख्येने जगातील दुसर्‍या क्रमांकाचा वैज्ञानिक-तंत्रवैज्ञानिकांचा ताफा भारताजवळ आहे. मात्र, या क्षेत्रात अजूनही आपल्याला मोठा पल्ला गाठायचा आहे. इतर देशांप्रमाणे शालेय जीवनातच याची गोडी लागल्यास, वैज्ञानिकांसह उद्योजक, इंजिनिअर आणि स्किल वर्कर तयार होण्यास मदत होईल. हाच ध्यास समोर ठेवून इलाईट सर्टिफिकेशन अ‍ॅण्ड इनोव्हेटिव्ह सोल्यूशनचे संचालक आबासाहेब थोरात यांची धडपड सुरू असून, त्यांचे ‘मिशन’ थक्क करणारे आहे.

‘बच्चा काबील बनो काबील… कामयाबी तो साली झक मारके पिछे आएगी’ हा थ्री इडियट चित्रपटातील डायलॉग अनेकांनी ऐकला. मात्र, त्याचा अर्थ किती जणांना उमजला, हे सांगणे तसे जोखमीचेच आहे. कारण बरेचसे असे विद्यार्थी आहेत, जे करिअरबाबत अखेरच्या क्षणापर्यंत गोंधळात असतात. समाज, कुटुंब, नातेवाईक यांचे ओझे डोक्यावर ठेवून आवड नसलेल्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देतात. मात्र, एका ठरावीक काळानंतर त्यांना नैराश्याने गाठले जाते. मग पश्चाताप, संताप, स्वभावात बदल या गोष्टी आपसूकच घडत जातात. मात्र, इलाईट सर्टिफिकेशन अ‍ॅण्ड इनोव्हेटिव्ह सोल्यूशन या संस्थेने विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच करिअरच्या दिशा निश्चित करता याव्या याकरिता वैज्ञानिक दृष्टिकोनातून धडे देण्याचा विडा उचलला आहे. त्यास 2017 साली केंद्र सरकारच्या नीती आयोगांंतर्गत अटल इनोव्हेशन मिशनमार्फत ‘अटल टिंकरिंग लॅब’ या प्रकल्पाने बळ दिले आहे. हा प्रकल्प विद्यार्थ्यांना घडविणारा आहेच, शिवाय देशाला तंत्रज्ञान, उद्योग व वैज्ञानिक क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कुशल ज्ञान आदींचे धडे दिले जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी सर्व प्रकारचे साहित्य या लॅबमध्ये उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांची रुची आवडी-निवडी लक्षात घेऊन त्यांना त्याबाबतच्या शिक्षणाकडे वळण्यासाठी एक प्रकारे प्रवृत्तच करण्याचे काम या लॅबच्या माध्यमातून केले जात आहे. अभियांत्रिकीला जो अभ्यासक्रम शिकविला जातो, त्याचीच ओळख शालेय दशेत करून दिली जात असल्याने, विद्यार्थ्यांना करिअर निवडणे शक्य होत आहे. पाच वर्षांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे यंदाचे दुसरे वर्षे असून, आदिवासी, शासकीय-निमशासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना या प्रकल्पांंतर्गत धडे देण्याची धडपड आबासाहेब थोरात यांची सुरू आहे.

अशी आहे टिंकरिंग लॅब
2017 साली केंद्र सरकारच्या नीती आयोगांतर्गत अटल इनोव्हेशन मिशनमार्फत ‘अटल टिंकरिंग लॅब’ हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 50 शाळांमध्ये ही लॅब उभारली जात आहे. विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन व त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देता येईल असे सर्वच साहित्य लॅबमध्ये उपलब्ध करून दिले आहे. शासनामार्फत सुमारे 20 लाख रुपये खर्चुन ही लॅब उभारली जाते. थ्रीडी प्रिंटर, टेलीस्कोप, ड्रोन, आधुनिक शिलाई मशीन, वॉटर प्युरिफायर तंत्र, ड्रील मशीन, ग्रॅण्डर मशीन आदींसह असंख्य साहित्य लॅबमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनच जपता येईल असे नाही, तर ‘स्किल वर्क’ला अनुसरूनही करिअरची निवड करता येईल. शालेयदशेत करिअर निवडताना विद्यार्थ्यांमध्ये कुठलाही गोंधळ उडू नये, याची पुरेपूर दखल या लॅबच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.

मंगळयान मोहिमेत थ्रीडी प्रिंटर
मंगळयान या अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहिमेत ‘टेक-बी’च्या थ्रीडी प्रिंटरचा काही प्रमाणात वापर करण्यात आला आहे. नाशिकच्या एका युवा उद्योजकाने ही किमया साधल्याने, नाशिककरांसाठी ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. याबाबत आबासाहेब थोरात सांगतात की, छत्तीसगढ, रायपूर येथे आमच्या टेक-बी या युनिटमार्फत थ्रीडी प्रिंटरच्या मॅन्युफॅक्चरिंगचे काम केले जाते. मंगळयान या अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेत भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) थ्रीडी प्रिंटर दिले असता, त्यांनी त्याचा वापर मोहिमेत केला. मंगळयान मोहीम देशातील प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय बनली होती. अशात आमच्या थ्रीडी प्रिंटरचा त्याला हातभार लागला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून, आमच्या कामाला उभारी देणारी आहे.

शिक्षकांना प्रशिक्षण, नंतर विद्यार्थ्यांना शिक्षण
शिक्षकांना प्रशिक्षण दिल्यास, अधिकाधिक विद्यार्थ्यांना या प्रकल्पांंतर्गत धडे देणे सहज शक्य होणार आहे. हाच विचार समोर ठेवून नुकतेच महात्मा गांधी विद्यामंदिर, आदिवासी सेवा समिती शिक्षण संस्था व इलाईट सर्टिफिकेशन अ‍ॅण्ड इनोव्हेटिव्ह सोल्यूशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील तब्बल 60 शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण दिले. स्वत: आबासाहेब थोरात यांनी या प्रशिक्षणादरम्यानची सर्व धुरा सांभाळली. प्रशिक्षकांनी अत्यंत सोप्या व सुबक पद्धतीने लॅबमधील सर्व तंत्रांची शिक्षकांना ओळख करून दिली. शिक्षकांनी या प्रशिक्षणादरम्यान, वैज्ञानिक दृष्टिकोनाने सर्व बाबी समजून घेतल्या. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या प्रशिक्षणादरम्यान, आर्डिनो, सेन्सर्स, थ्रीडी प्रिंटरचा वापर तसेच ड्रोन उडविणे तसे आव्हानात्मक होते. मात्र, शिक्षकांनी अत्यंत सहजतेने याबाबी समजून घेतल्या. आता या शिक्षकांवर शेकडो विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही करण्याबरोबरच ‘स्किल वर्क’चे धडे देण्याची जबाबदारी आहे. ते ही जबाबदारी लीलया पार पाडतील, असा विश्वास आबासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

  • विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक कार्याचीआवडअसलेल्या आबासाहेब थोरात यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सातासमुद्रापार पोहोचविला. मॉरिशसमध्ये फुले, शाहू, आंबेडकर विचार संम्मेलन आयोजित करून सामाजिक कार्याची आवड जोपासली. या संमेलनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यक उत्तम कांबळे हे देखील उपस्थित होते. आबासाहेब थोरात यांच्या याच कार्यासाठी मॉरिशस सरकारने त्यांचा गौरव केला. ही बाब नाशिककरांसाठी नक्कीच भुषणावह आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.