मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली कार सापडली

ही कार मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आली

0

मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तथा उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया इमारतीजवळ गुरुवारी सायंकाळी स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. या कारमध्ये जिलेटिन कांड्या भरलेल्या होत्या. त्यांचे प्रमाण इतके होते की, एक भीषण स्फोट घडवून आणणे शक्य झाले असते. मात्र वेळीच ही कार सापडल्याने यंत्रणेनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अल्टामाऊंट रोडवर मुकेश अंबानी यांची भव्य ‘अँटिलिया’ इमारत आहे. अँटिलियापासून जवळच काही अंतरावर एक स्कॉर्पियो कार उभी होती. त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. कारमधून जिलेटीन सदृश्य वस्तू ताब्यात घेतल्याचे गृहराज्यमंत्री शभूराजे देसाई यांनी सांगितले. अँटिलियाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर आता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. बॉम्ब निकामी करणारे पथक तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले.

सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, या कारचा नंबर बनावट असल्याने कारच्या मालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. बराच वेळ कार उभी असल्याने मुकेश अंबानी यांच्या सुरक्षारक्षकांना कारबाबत संक्षय आला. त्यांनी लगेचच याबाबतची माहिती स्थानिक पोलीसांना दिली. त्यानंतर गामदेवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व स्कॉर्पिओची तपासणी सुरु केली. गाडीत जिलेटीनच्या २० कांडया सापडल्या. श्वान पथकालाही तपासासाठी तिथे आणले होते. फक्त जिलेटीन कांडया सापडल्या असे मुंबई पोलिसांच्या पीआरओने सांगितले. स्फोटक साहित्य सापडल्यानंतर कारमायकल रोडवर मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिसच्या एटीएसचे पथकही तिथे येऊन गेले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.