पंतप्रधान घरकूल योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; खासदार हिना गावित यांनी केली सीबीआय चौकशीची मागणी

0

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेतून बोगस लाभार्थ्यांच्या नावे रकमा वळत्या करीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याची खळबळजनक माहिती भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऊच्च अधिकऱ्यांची साखळी यात कार्यरत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पंतप्रधानांना भेटून सीबीआय चौकशी लावण्याची मागणी करणार असल्याचेही खासदार हिना गावित याप्रसंगी म्हणाल्या.

केंद्रीय योजनांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील चालू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी दिशा समितीची बैठक आज शनिवार दिनांक 13 मार्च 2019 रोजी दुपारी पार पडली. नंदुरबारच्या खासदार तथा भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध योजनांचा आणि कामांचा आढावा घेण्यात आला. त्या झालेल्या कामकाजाची माहिती देण्यासाठी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. भाजपाचे आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

त्याप्रसंगी पंतप्रधान आवास योजनेतील भ्रष्टाचाराची माहिती देतांना खा. डॉ. हिना गावित यांनी सांगितले की, अक्कलकुवा धडगाव आणि नवापूर या तीन तालुक्यात घरकुल योजनेत मोठे गैरप्रकार घडले असल्याच्या तक्रारी दिशा समितीला प्राप्त झाल्या होत्या. मागील बैठकीतच संबंधित विभाग प्रमुखांना आणि प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांना या गैरप्रकाराची तातडीने चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरच्या कालावधीत मात्र काही चौकशी झाली नसल्याचे आज आढावा घेताना उघडकीस आले. खा. डॉ. हिना गावित यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी अक्कलकुवा तालुक्यातील १७८ प्रकरणे समोर आली होती.

आजच्या बैठकीत तीन तालुक्यांमध्ये गैरप्रकार समोर आला असून जवळपास ५०० घरकुल प्रकरणात गैरव्यवहार असू शकतात. एका घरकुलाला दीड लाख रुपये मिळतात. असे लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजनेतून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला असू शकतो. घोटाळ्याचे स्वरूप सांगतांना डॉक्टर हिना गावित म्हणाल्या की, काही घरकुल प्रकरणात चुकीचे जिओ टॅगिंग करून दिशाभूल करण्यात आली आहे. तर काही प्रकरणात शबरी योजनेचे लाभार्थी असलेल्यांनाही पंतप्रधान आवास योजनेत घुसडण्यात आले आहे. जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्या नावे आलेले पैसे परस्पर हडपलेत. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गे गैरप्रकार करण्यात आल्याचे पुरावे प्राप्त झालेत. जसे की पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल लाभार्थीच्या नावे मंजूर केले व रक्कम मात्र निराळ्या व्यक्तीचे खाते क्रमांक जोडून वळती केली, घरकूल एकच ऊभारायचे परंतु कागदोपत्री त्याच घरातील ४, ५ अथवा १० सदस्यांची प्रकरणे दाखवून रकमा काढायच्या, जनगणनेत नाव नाही अशी नावे लाभार्थ्यांच्या यादीत जोडायचे व खरे लाभार्थीचे नाव परस्पर वगळून टाकायचे; असे अनेक प्रकार घडले आहेत.

याचे पुरावे समोर मांडून सुद्धा चौकशी केली जात नसल्यामुळे क्लास वन पासून क्लास फोर पर्यंतचे अधिकारी-कर्मचारी यांची साखळी या भ्रष्टाचारात कार्यरत असल्याची खात्री झाली. म्हणून या प्रकरणाची सीबीआय मार्फत तातडीने चौकशी केली जावी आणि कडक कारवाई केली जावी, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे करणार आहोत. नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची साखळी संगनमताने गैरप्रकारांना पाठीशी घालत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करताना डॉक्टर हिना गावित यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.

त्या म्हणाल्या की एकूण सर्व प्रकार गंभीर असताना वरिष्ठ अधिकारी दखल घ्यायला का तयार नाही? पुरावे सादर करून सुद्धा चौकशी का लावली नाही? जनगणनेच्या यादीत आणि लाभार्थ्यांच्या यादीत नसलेल्यांना हप्ते कसे काय गेले? लाभार्थ्यांची नावे परस्पर बदलण्याचा अधिकार यांना कोणी दिला? डॉक्टर हिना गावित यांच्या या गंभीर आरोपांमुळे नंदुरबाार जिल्हा प्रशासनातील अनेक बडे अधिकारी संशयाच्या भोवर्‍यात आले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.