आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे रुग्णलयातून पत्र, केले कळकळीचे आवाहन!

0

मुंबई : कोरोनाच्या लढाईत सुरुवातीपासूनच महाराष्ट्रभर दौरे करून आरोग्य यंत्रणेची चोख व्यवस्था सांभाळणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्याचबरोबर राज्यात कोरोनाची स्थिती बिकट होऊ लागल्याने काळजी व्यक्त केली जात आहे. विदर्भासह मुंबई-पुण्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर लॉकडाउनबाबतचा आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातूनच एक पत्र जनतेसाठी लिहिले असून, लॉकडाउनचे संकट ओढावू नये यासाठी जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे.

कोरोनाचे संकट ओढावले तेव्हापासून सातत्याने राज्यभर दौरे करून आरोग्य सेवेचा आढावा घेणारे आरोग्य मंत्री राजेश टोपे गेल्या आठवड्‌यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र सध्या पुन्हा कोरोनाचे संकट ओढावले असून, दररोज कोरोना रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी पत्र लिहिले असून,  त्यात त्यांनी जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे.

त्यांनी पत्रात लिहिले की, गेल्या वर्षभरापासून आपण करोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक करोना योद्धे, विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण करोना नियंत्रित करू शकलो. मात्र, अद्यापही करोना गेलेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढतोय. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या हॉस्पिटलमध्ये करोनाविरुद्ध लढतोय. गेल्या वर्षभरापासून विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो. करोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या. परंतु करोनाला माझ्याजवळ येणं जमलं नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सद्बावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा करोना विरुद्धच्या सामूहिक लढातईत सहभागी होणार आहे.

समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाउन काळात सर्व जनतेने करोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र आता पुन्हा लॉकडाउन परवडणार नाही. लॉकडाउन टाळणं केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाउन टाळा. शेवटी स्वतःची काळजी म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी, प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी. तेव्हा चला तर हरवूया करोनाला. एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने, असं आवाहन टोपे यांनी महाराष्ट्राला केलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.