खामोश : पहिल्याच रॅलीत साप, विंचू, कोब्राची भाषा नको होती, शत्रुघ्न सिन्हांनी मिथुन चक्रवर्तींना सुनावले

भाजपच्या रॅलीत मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या भाषणाचा सिन्हा यांनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला

0

नागपूर : तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सत्तेतून बाहेरचा मार्ग दाखविण्यासाठी भाजपने आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. भाजपचे सर्व वरिष्ठ मंत्री पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून आहेत. पंतप्रधानांनीही सभांचा धडाका लावला आहे. त्यात आता सेलिब्रिटींनी उडी घेतली आहे. यामध्ये सर्वात पहिले नाव मिथून चक्रवर्ती यांचे जोडले आहे. वास्तविक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामुळेच संसदेत पोहोचलेल्या अभिनेता मिथून चक्रर्वी यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत आता ममताच्या विरोधातच बंड पुकारले आहे. मिथुनने भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पहिल्याच भाषणात विरोधकांवर जोरदार निशाणा साधल्याने पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे वारे चांगलेच तापले आहे.

मिथुनने खास आपल्या स्टाईलमध्ये भाषणाबाजी करताना ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे. त्यांचे हे भाषण प्रसिद्ध अभिनेते आणि मिथुन यांचे मित्र तथा काँग्रेस खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना अजिबातच पटले नसल्याचे दिसून येत आहे. शत्रुघ्न सिन्हा आज नागपूर येथे होते. त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. जेव्हा त्यांना त्यांचे मित्र मिथुनच्या भाषणाबाबत विचारले तेव्हा त्यांनी चांगलेच खडेबोल सुनावले.

ते म्हणाले की, मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हे चांगलं आहे. ते माझे जवळचे मित्र आहेत. लोकप्रिय व्यक्तीमत्व आहे. मात्र, पहिल्याच रॅलीत त्यांनी साप, विंचू, कोब्राची भाषा बोलायला नको होती. ते राजकीय बोलले असते तर चांगलं झालं असतं, अशा शब्दात सिन्हा यांनी मिथुन चक्रवर्ती यांना राजकीय सल्ला दिला. पुढे ते म्हणाले की, मिथून चक्रवर्ती यांच्या प्रवेशानं भाजपला फायदा होईल असं नाही. त्यांना फायद्यासाठीच भाजपमध्ये आणण्यात आलं. पण असं होऊ नये की उशिरा आणलं. ममता बॅनर्जी मजबूत आहेत. त्यांना हलवणं एवढं सोपं होणार नाही, असा दावाही शत्रुघ्न सिन्हा यांनी केलाय.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकेची झोड उठवून दिली. पंतप्रधान मोदी यांनी रॅलीत जे बोलायला हवं होतं ते झालं नाही. त्यांच्या भाषणात मटेरियलची कमी असल्याचं दिसून आलं. आपल्या भाषणात त्यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला असता तर चांगलं झालं असतं, भाजपची रॅली चांगली झाली. पण ममता बॅनर्जींची रॅली या पेक्षा मोठी होती. मिथुन चक्रवर्ती यांच्यामुळे गर्दी वाढली होती, असा टोलाही सिन्हा यांनी लगावला.

दरम्यान, मिथुन चक्रर्वी यांनी कोलकाता येथे भाजपच्या रॅलीत बोलताना ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. मी असली कोब्रा आहे. दंश केला तर तुमचा फोटो घरात लागेल. मी फक्त एक साप नाही, मी क्रोब्रा आहे. एका दंशात संपवून टाकेन, अशा शब्दात त्यांनी ममता बॅनर्जी यांना इशारा दिला होता. यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटातील ‘मारुंगा यहां लाश गिरेगी समशान में’ हा खास डायलॉगही म्हटला. पण हा डायलॉग आता जुना झाला असल्याचंही मिथुनने म्हटले होते. दरम्यान, मिथुन यांच्या या भाषणबाजीचा आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून चांगलाच समचार घेतला जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.