Video : आशादीप वसतिगृह प्रकरातील दोषींवरील कारवाईसाठी समिती गठीत!

वसतिगृहातील मुलांना नग्न करून नाचविणाऱ्यांना कठोर शिक्षेची होतेय मागणी

0

जळगाव :  शहरातील गणेश कॉलनीतील आशादीप वसतिगृहात मुलींना नग्न करून त्यांना नृत्य करायला लावत असल्याच्या तरूणीच्या तक्रारीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून आज त्यांनी वसतिगृहातील काही मुलींचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

गणेश कॉलनीतील उच्चभ्रु वस्तीत असलेल्या आशादीप वसतिगृहातील घडलेल्या या प्रकरणाचे पडसाद आज थेट विधानसभेत उमटले. त्यावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी समिती नेमण्याची घोषणा विधानसभेत केली. संपूर्ण राज्यभरात वसतिगृहात घडलेल्या या प्रकाराविषयी संताप व्यक्त होत आहे. मात्र या प्रकरणातील सत्य अजून बाहेर येणे बाकी आहे. स्थानिक स्तरावरही वसतिगृहात घडलेल्या प्रकाराची चौकशी आता सुरू झाली आहे.

चार सदस्यीय समितीकडून चौकशी 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीत महिला पोलीस अधिकारी कांचन काळे, मानसोपचार तज्ञ डॉ. कांचन नारखेडे आणि अन्य एक महिला स्त्रीरोग तज्ञ अशांचा समावेश आहे. वसतिगृहातील प्रकाराची चौकशी करण्यासाठी ही समिती आज सकाळी १० वा. आशादीप वसतिगृहात पोहोचली. तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर सायंकाळी ७ वा. समितीच्या अध्यक्षा आणि सदस्य आशादीप वसतिगृहातून बाहेर पडले. वसतिगृहातील प्रकरणाशी संबंधित तक्रारदार आणि इतर काही मुलींचे जाबजबाब नोंदविण्यात आले आहे. आमची चौकशी अजून सुरू आहे ती पूर्ण झाली नाही. अजून काही मुलींचे जबाब घेणे बाकी आहे. चौकशी पुर्ण करून अहवाल लवकरात लवकर जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती चौकशी समितीच्या अध्यक्षा तथा सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.