आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेस प्रारंभ

0

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी – 2020 सत्राच्या अंतीम वर्षाच्या लेखी परीक्षेस आज प्रारंभ झाला आहे. विद्यापीठाच्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, समचिकीत्सा, परिचर्या, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष विज्ञान आदी विषयांच्या लेखी परीक्षा घेण्यात येत आहेत.

याबाबत माहिती देतांना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील सुमारे १० हजार पेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा घेण्यात येत असून राज्यातील विविध 165 परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रंावर सोडिअम हायपोक्लोराईड सोल्यूशन व लिक्विड सॅनिटाइझरचा वापर करण्यासाठी विद्यापीठाकडून प्रत्येक परीक्षा केंद्रास रुपये वीस हजार इतकी रक्कम देय करण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाकडून सदरील परीक्षेचे सी.सी.टी.व्ही. यंत्रणेद्वारे निरीक्षण करण्यात येणार असून प्रत्येक परीक्षा खोलीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. प्रत्येक पेपर नंतर एका दिवसाचा खंड देण्यात आला आहे. लेखी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी, शिक्षक व संबंधित कर्मचारी यांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. सदरील सर्व परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळ www.muhs.ac.in जाहिर करण्यात आले आहे. सदरील परीक्षा दि. 26 मार्च 2021 पर्यंत कालावधीत ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सदर विद्यार्थी त्यांच्या इंटर्नशिपच्या कालावधीमध्ये कोव्हिड-19 रुग्ण सेवेकरीता उपलब्ध होणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने सदर परीक्षा घेण्यास
मान्यता प्रदान केली आहे.

या परीक्षेत वैद्यकीय विद्याशाखेचे 5247, दंत विद्याशाखेचे 747, आयुर्वेद विद्याशाखेचे 563, होमिओपॅथी विद्याशाखेचे 3034, युनानी विद्याशाखेचे 40 व तत्सम विद्याशाखेचे 1364 विद्याथी परीक्षा देणार आहेत. परीक्षे विषयीचे कामकाज यशस्वी करण्यासाठी मा. कुलगुरु यांचे मार्गदर्शन तसेच, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यापीठाचे उपकुलसचिव महेंद्र कोठावदे, प्रमोद पाटील, डॉ. संतोष कोकाटे, राजेंद्र शहाणे, युवराज भारंबे, विजय जोंधळे, विजय सोनवणे, श्रीमती ज्योती इटनकर, किशोर जोपळे यांनी परिश्रम घेतले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.