हा शेवटचा इशारा, लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई : विविध जिल्ह्यांमध्ये निर्बंध घातल्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने चिंता वाढतच आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जातो काय? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणेसोबतच राज्यातील आरोग्य प्रशासन आणि राज्य सरकारची देखील चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॉटेल, उपहारगृह आणि मॉलच्या प्रतिनिधींची ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कळकळीचं आवाहन करताना कडक निर्बंधांबाबत देखील इशारा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या भेटीविषयी मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्वीटरद्वारे माहिती देण्यात आली आहे. कोविडचा वाढता संसर्ग कसा रोखता येईल? याविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॉटेल, उपहारगृहांच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती. त्यामध्ये त्यांनी हॉटेल, उपहारगृहांकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच, राज्यातल्या करोनासंदर्भातल्या निर्बंधांविषयी ते म्हणाले, लॉकडाऊन लागू करून सगळं बंद करणं आम्हालाही नको आहे. पण मास्क घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं अशा नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. आम्हाला कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका.

राज्यातल्या आजच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात तब्बल १५ हजार ६०२ नवे करोनाबाधित सापडले आहेत, तर ८८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे करोना हळूहळू गंभीर होऊ लागल्याचं चित्र राज्यात निर्माण झालं आहे. मात्र, असं असलं, तरी लोकांमध्ये करोनाचं गांभीर्य कमी झाल्याचं देखील दिसून येत असून त्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरून वारंवार चिंता व्यक्त केली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.